प्राईम टाईमला ३ तास केबल बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

प्राईम टाईमला अर्थात संध्याकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत प्रत्येक घराघरातून टीव्हीचा, हिंदी-मराठी मालिकांचा आवाज येतो. जो-तो हातात रिमोट घेऊन असताे. पण गुरूवारी मात्र प्राईम टाईमला अनेकांना त्यातही महिला वर्गाला टीव्ही पाहता येणार नाही. कारण गुरूवारी संध्याकाळी ७ ते १० यावेळेत, तीन तास एेन प्राईम टाईमला केबल सेवा बंद राहणार असल्यानं टीव्ही बंद राहणार आहे. 

केबल चालक आक्रमक 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणा (ट्राय) च्या नव्या नियमावलीला केबल चालकांचा विरोध असून आता राज्यभरातील केबल चालक आक्रमक झाले आहेत. गुरूवारी, २७ डिसेंबरला सायंकाळी ७ ते १० यावेळेत केबल बंद करण्याचा निर्णय केबल आॅपरेटर अॅण्ड ब्राॅडकास्ट असोसिएशनने घेतला आहे.

वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य

२९ डिसेंबरपासून देशभरात केबल टीव्ही, डीटीएच ग्राहकांना वाहिन्या निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. जी वाहिनी हवी असेल त्या वाहिन्यांसाठी निश्चित दर ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. मात्र, या निर्णयाला केबल चालकांनी विरोध केला आहे. कारण या निर्णयामुळे केबल व्यावसायिकांच्या पोटावर पाय येणार आहे. त्यामुळे आता केबल चालकांनी याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. बुधवारी सकाळी शिवसेनेचे आमदार अॅड. अनिल परब यांच्या उपस्थितीत वांद्रेतील रंगशारदा सभागृहात बैठक पार पडली.

व्यवसाय धोक्यात

या बैठकीत ट्रायने वाहिन्यांचे दर ठरवताना ग्राहक-केबल चालक-व्यावसायिकांचा विचार केला नसल्याचा आरोप करण्यात आला. केबल व्यवसाय या निर्णयामुळे धोक्यात येणार आहेच, पण त्याचवेळी ट्रायचे नवे दर लक्षात घेता ग्राहकांवरही मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. या पार्श्वभूमीवर केबल चालकांनी या निर्णयाला विरोध करत आता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गुरूवारी प्राईम टाईमला तीन तास ब्लॅक आऊट करण्याचा, केबल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरूवारी संध्याकाळी ७ ते १० या वेळेत टीव्ही बंद राहणार आहे.


हेही वाचा - 

सायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या