Advertisement

सायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादसह इतर वैद्यकीय कॉलेजमधील जवळपास १००० निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी या विरोधात फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे.

सायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन
SHARES

राज्यातील १००० निवासी डॉक्टरांना विद्यावेतन (स्टायपेंड) न मिळाल्यानं नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादमधील वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे. या फळ विक्री आंदोलनाला मुंबईतील डॉक्टरांनी पाठिंबा केला अाहे. मंगळवारी १० वाजल्यापासून सायन रूग्णालयातील डॉक्टर रुग्णालयाबाहेर फळ विक्री करत होते. जवळपास २०० पेक्षा अधिक निवासी डॉक्टर या आंदोलनात सहभागी झाले होते. वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होऊ नये यासाठी डॉक्टर आपापल्या वेळेनुसार यात सहभागी होतं होते. 


नेमकं प्रकरण काय?

नागपूर, अंबेजोगाई आणि औरंगाबादसह इतर वैद्यकीय कॉलेजमधील जवळपास १००० निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून स्टायपेंड मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी या विरोधात फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला नागपूर अंबेजोगाई आणि औरंगाबादमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला असून याला पाठिंबा म्हणून सायन रूग्णालयातील डॉक्टरांनी फळविक्री आंदोलन सुरू केलं आहे. सायन रूग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या या आंदोलनानंतर लवकरच जे.जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरही फळविक्री आंदोलन करून विरोध दर्शवणार आहेत.


काय अाहेत मागण्या

गेल्या काही वर्षांपासून सरकारी निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ले वाढत अाहेत.  अशाप्रकारे झालेल्या हल्ल्यात डॉक्टरांसाठी कोणत्याही प्रकारची अलार्म सिस्टिम किंवा सिक्युरिटी ऑडीट नाही. त्यामुळ अशा प्रकारच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात. त्याशिवाय निवासी डॉक्टरांना राहण्यासाठी सुविधा नाहीत. त्यांना २४ तासांपेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. अशा वेळी किमान त्यांना गरजेच्या काही वस्तू उपलब्ध करून द्याव्यात. तसेच डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना बॉन्ड अलॉटमेंट (बंदपत्रित)  सेवा अजूनही ऑफलाईन असल्यानं त्यांना डॉक्टरांची गरज असल्या ठिकाणी सेवा पुरवता येत नाही. त्यामुळे ते ऑनलाईन उपलब्ध करावेत. यांसह इतर मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी हे फळ विक्री आंदोलन सुरू केलं आहे. 


गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक रुग्णालयातील डॉक्टरांना विद्यावेतन दिलं जात नसल्यानं आम्ही बऱ्याचदा आंदोलनाचा निर्णय घेतला होता. परंतु अनेकदा हा निर्णय घेतला की विद्यावेतन देण्यात यायचं. परंतु पुन्हा तशीच परिस्थिती उभी राहायची. त्यामुळे अनेकदा डॉक्टरांचे हाल झाले. यामुळं राज्यासह मुंबईतील डॉक्टरांनी शांततेच्या मार्गातून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाचा परिणाम वैद्यकीय सेवेवर होणार नसला तरी मागण्या मान्य नाही झाल्या तर डॉक्टरांचा उद्रेक होईल. त्यामुळं लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढावा. 

- डॉ. लोकेश चिरवटकर, केंद्रीय मार्डचे अध्यक्ष



हेही वाचा - 

जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा शुक्रवारी रास्ता रोको




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा