जे.जे.रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचा शुक्रवारी रास्ता रोको

डाॅक्टरांच्या मागण्यांवर ठोस पाऊल उचललं जात नसल्यानं मार्ड डॉक्टरांच्या वतीनं १५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं होतं. मात्र, यावर उत्तर न आल्यानं वेळोवेळी मार्डच्या वतीनं पत्र देण्यात आली. अखेरीस येत्या गुरूवारी २७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मार्डचे डाॅक्टर यांच्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

SHARE


वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्यानं येत्या शुक्रवारपासून जे.जे. रुग्णालयातील निवासी डाॅक्टर रास्ता रोको आंदोलन करणार अाहेत. येत्या गुरूवारी जे.जे. रुग्णालयातील मार्ड डॉक्टर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार अाहे. या बैठकीत वेतनवाढ, सुरक्षा, प्रसुती रजा यांसह विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला आहे.


वेतनवाढ, रजा नाही

दर तीन वर्षाने निवासी डॉक्टरांच्या वेतनात वाढ करण्यात येते. २०१५ साली ही वेतनवाढ करण्यात आली होती. त्यानंतर २०१८ च्या ऑगस्ट महिन्यात वेतनवाढ होणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप निवासी डॉक्टरांच्या वेतनात कसलीही वाढ करण्यात आलेली नाही. तसंच महिला डॉक्टरांना प्रसुती रजा, क्षयरोगाच्या उपचारांसाठी रजा देण्यात येत नाहीत. काही महिन्यांपूर्वी सरकारी निवासी डॉक्टरांवर रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर निवासी डॉक्टरांसाठी सरकारी रूग्णालयात अलार्म सिस्टिम व चौकशी समिती स्थापन करण्यात येईल असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण व संशोधन (डीएमईआर) ने दिलं होतं. 


जे. जे. उड्डाणपुलावर आंदोलन

डाॅक्टरांच्या मागण्यांवर ठोस पाऊल उचललं जात नसल्यानं मार्ड डॉक्टरांच्या वतीनं १५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आलं होतं. मात्र, यावर उत्तर न आल्यानं वेळोवेळी मार्डच्या वतीनं पत्र देण्यात आली. अखेरीस येत्या गुरूवारी २७ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मार्डचे डाॅक्टर यांच्यात बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

या चर्चेत मागण्यांवर तोडगा निघाला नाही तर २८ डिसेंबर रोजी जे. जे. उड्डाणपुलावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तसंच आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या बंगल्यासमोरही निर्दशनं करण्यात येणार असल्याचा इशारा मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. लोकेशकुमार चिरवटकर यांनी दिला आहे. 


विविध मागण्या 

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांना बंधपात्रता प्रक्रिया अद्यापही ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झालेली नसून या प्रक्रियेतील त्रुटीही मार्डने मुख्यमंत्र्यांसमोर अनेकदा मांडल्या आहेत. तसंच अनेकदा वैद्यकीय रुग्णालयांतील औषधे व साहित्यांचा तुटवडा निर्माण होतो. परिणामी रूग्णांना बाहेरून औषधं आणावी लागतात. त्यामुळं यासाठी ऑडिट समितीची स्थापना करणे, सरकारी रुग्णालयांत चोवीस तास निवासी डॉक्टरांसाठी उपाहारगृहांची सोय करणे यांसह विविध मागण्या मार्ड संघटनेच्यावतीनं करण्यात आल्या आहेत.हेही वाचा - 

मुंबईकरांसाठी नववर्षाची भेट! मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने

हुश्श! बीकेसीतील हायब्रिड बस सुरूच राहणार, थकीत रकमेचा वाद मिटलासंबंधित विषय
ताज्या बातम्या