Advertisement

मुंबईकरांसाठी नववर्षाची भेट! मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने


मुंबईकरांसाठी नववर्षाची भेट! मुंबई ते नवी मुंबई प्रवास करा वाॅटर टॅक्सीने
SHARES

मुंबईतील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्याअंतर्गत मुंबई-नवी मुंबई अंतर कमी करण्यासाठी आता मुंबई पोर्ट ट्रस्टने 'वाॅटर टॅक्सी' सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुंबई पोर्ट ट्रस्टचे संजय भाटीया यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. भाऊचा धक्का ते बेलापूर, नेरूळ आणि मांडवा अशी ही 'वाॅटर टॅक्सी' सेवा असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पाण्यावरून सुसाट धावणाऱ्या या 'वाॅटर टॅक्सी'मधून प्रवास करण्याचा आनंद लवकरच मुंबईकरांना घेता येणार आहे.


निविदेला ३ कंपन्यांचा प्रतिसाद

मुंबईला मोठा समुद्र किनारा लाभलेला असूनही शहरात जलवाहतुकीला म्हणावं तितकं महत्त्व मिळालेलं नाही. हे चित्र बदलण्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टनं ठरवलं आहे. त्याचाच भाग म्हणून क्रूझ वाहतुकीकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने विशेष लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यापाठोपाठ 'वाॅटर टॅक्सी' सुरू करण्याचा निर्णय घेत मुंबई पोर्ट ट्रस्टने निविदाही मागवल्या आहेत. या निविदेला ३ कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला असून लवकरच पुढची प्रक्रिया सुरू करत कंत्राट अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


कामाला वेग

'वाॅटर टॅक्सी' किती प्रवासी क्षमतेची असेल, या सेवेचे दर काय असतील, वेळा कशा असतील हे सर्व निविदा अंतिम झाल्यानंतरच निश्चित करण्यात येणार आहे. सुरूवातीला 'वाॅटर टॅक्सी'ची सेवा गेट वे आॅफ इंडिया ते एलिफंटा अशी ठेवण्यात येईल. तर दुसरीकडे भाऊचा धक्का ते नवी मुंबई विमानतळ, भाऊचा धक्का ते मांडवा आणि भाऊचा धक्का ते बेलापूर-नेरूळ अशी नवी 'वाॅटर टॅक्सी' सेवा देखील सुरू करण्यात येईल. त्यादृष्टीने मुंबई पोर्ट ट्रस्टकडून कामाला वेग देण्यात आला आहे, अशी माहिती देखील भाटीया यांनी दिली.


जेट्टीचं काम सुरू

नवी मुंबई विमानतळाला लागून जेट्टी तयार करण्याचं काम सुरू असून अन्य ठिकाणीही जेट्टी तयार करण्यात येत आहेत. जेट्टी तयार झाल्याबरोबर 'वाॅटर टॅक्सी' सेवा सुरू करण्यात येणार असल्याचं मुंबई पोर्ट ट्रस्टचं म्हणणं आहे. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या वाॅटर सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मुंबई पोर्ट ट्रस्टकडून व्यक्त करण्यात येत आहे.हेही वाचा-

हुश्श! बीकेसीतील हायब्रिड बस सुरूच राहणार, थकीत रकमेचा वाद मिटला

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?संबंधित विषय
Advertisement