Advertisement

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं पहिलं स्थानक, कारशेड बीकेसीमध्येच बांधण्यात येत आहे. तर मेट्रो-३ स्थानकही बीकेसीत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत पुणे-मुंबई हायपरलूपचा शेवटही बीकेसीतच करण्याचा 'पीएमआरडीए'चा विचार आहे.

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?
SHARES

मुंबई ते पुणे हे अंदाजे १५० किमीचं अंतर केवळ १४ मिनिटांत पार करण्याचा चमत्कार हायपरलूप या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)ने कामाला वेग दिला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा पूर्व व्यवहार्यता अभ्यास पूर्ण झाला असून ६ महिन्यांत डीपीआर अर्थात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार होणार असल्याची माहिती 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गीते यांनी खास 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली. महत्त्वाचं म्हणजे पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पातील शेवटचं स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल-बीकेसी करण्याचा विचार असल्याचंही गीते यांनी सांगितलं आहे.


पूर्व व्यहार्यता अभ्यास तयार

मुंबई-पुणे ही दोन महत्त्वाची शहरं जवळ आणण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तयार करण्यात आला आहे. या द्रुतगती महामार्गामुळं १५० किमीचं अंतर अडीच-ते तीन तासांवर आलं आहे. हे अंतर आणखी कमी करण्यासाठी राज्य सरकारनं अत्याधुनिक हायपरलूप प्रकल्प हाती घेतला आहे. त्याची जबाबदारी 'पीएमआरडीए'वर टाकली आहे. यासाठी वर्षभरापूर्वीच राज्य सरकार आणि अमेरिकेच्या व्हर्जिन कंपनीमध्ये करार झाला आहे. हा करार झाल्यानंतर 'पीएमआरडीए'ने एका कंपनीकडून या प्रकल्पाचा पूर्व व्यहार्यता अभ्यास तयार करून घेतला आहे.


'डीपीआर' तयार करणार

या अभ्यासाचा अहवाल मुंबई आयआयटीकडे पाठवण्यात आला असून त्यांच्याकडून या अहवालाचा अभ्यास करण्यात आला आहे. यासंबंधीचा अहवाल लवकरच 'पीएमआरडीए'कडे सादर होण्याची शक्यता असल्याचंही गीते यांनी सांगितलं आहे. हा अहवाल आल्यानंतर तात्काळ 'डेव्हलपमेंट परफाॅर्मन्स रिपोर्ट' (डीपीआर) तयार करण्याचं काम हाती घेण्यात येणार असून हा 'डीपीआर' ६ महिन्यांत तयार होईल.


पुढच्या वर्षात कामाला सुरूवात

या 'डीपीआर'मधून हा मार्ग नेमका किती किमीचा असेल, तो कसा आणि कुठून जाईल, त्यासाठी किती खर्च येईल, त्यासाठी किती वेळ लागले या सर्व बाबी अंतिम होतील. त्यानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लावण्याच्या कामाला सुरूवात होईल, असंही गीते यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या वर्षात, २०१९ मध्ये खऱ्या अर्थानं पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्प आकार घेताना दिसेल.


म्हणून बीकेसीत

बीकेसी हे सध्या मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचं आर्थिक केंद्र. तसंच सध्या मुंबईत मोकळी जागा याच ठिकाणी असून बीकेसीतून आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय विमानतळ असो वा मुंबईच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात पोहचणं सोपं होतं. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचं पहिलं स्थानक, कारशेड बीकेसीमध्येच बांधण्यात येत आहे. तर मेट्रो-३ स्थानकही बीकेसीत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत पुणे-मुंबई हायपरलूपचा शेवटही बीकेसीतच करण्याचा 'पीएमआरडीए'चा विचार आहे.

तसं झाल्यास पुणे ते बीकेसी हे अंतर १४ मिनिटांत पार करता येणार आहे. तर इथून पुढं काही तासांतच अहमदाबाद गाठता येईल, कुलाब्याला वा मुंबईच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मेट्रोनं पोहोचणंही शक्य होईल.



हेही वाचा-

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाला 'गती'

'हायपर' गर्दीवर 'हायपरलूप'चा उतारा, मुंबई ते पुणे १४ मिनिटांत शक्य



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा