Advertisement

'हायपर' गर्दीवर 'हायपरलूप'चा उतारा, मुंबई ते पुणे १४ मिनिटांत शक्य

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ताशी १००० किमी वेगाने गायब होणारी 'हायपरलूप' मुंबई-पुणे मार्गावर प्रत्यक्षात साकारू शकेल का? याबद्दल सर्वांच्याच मनात शंका होती. मात्र व्हर्जिन हायपरलूप कंपनीने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर शिक्कामोर्तब करत या प्रकल्पाच्या स्वप्नाला नवं बळ दिलं आहे.

'हायपर' गर्दीवर 'हायपरलूप'चा उतारा, मुंबई ते पुणे १४ मिनिटांत शक्य
SHARES

सुपरफास्ट, गारेगार प्रवास म्हणजे विमान, मेट्रो, मोनो आणि बुलेट ट्रेन इतकंच काय ते आतापर्यंत आपण एेकलं होतं. पण २०१७ मध्ये मुंबई-पुण्यातील गर्दीवर उतारा म्हणून वाहतुकीचा नवा सुपर-सुपरफास्ट पर्याय समोर आला. या पर्यायाचं नाव आहे 'हायपरलूप'. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच ताशी १००० किमी वेगाने गायब होणारी 'हायपरलूप' या मार्गावर प्रत्यक्षात साकारू शकेल का? याबद्दल सर्वांच्याच मनात शंका होती. मात्र व्हर्जिन हायपरलूप कंपनीने या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर शिक्कामोर्तब करत या प्रकल्पाच्या स्वप्नाला नवं बळ दिलं आहे.

या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याची जबाबदारी अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूप कंपनीवर टाकण्यात आली होती. त्यानुसार कंपनीने हा प्रकल्प व्यवहार्य असल्याचा अहवाल नुकताच सादर केल्याची माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)चे महानगर आयुक्त किरण गीते यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


२०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण

त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा होणार असून २०२६ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस पीएमआरडीएने व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने मुंबई ते पुणे प्रवास केवळ १४ मिनिटांत पूर्ण करण्याचं मुंबईकरांचं स्वप्न २०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.



अजून कुठे प्रकल्प?

अमेरिकेतील 'हायपरलूप वन' कंपनीने हायपरलूप हे चमत्कारीत वाहतुकीचं तंत्रज्ञान विकसित केलं आहे. सध्या अमेरीकेत आणि दुबईत हायपरलूप प्रकल्पाचं काम सुरू आहे. तर भारतात पहिल्यांदाच मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी 'पीएमआरडीए'वर टाकण्यात आली आहे.



करारानुसार सर्वेक्षण

'पीएमआरडीए' आणि व्हर्जिन हायपरलूपमध्ये २ महिन्यांपूर्वी एक करार झाला. या करारानुसार हा प्रकल्प व्यवहार्य आहे का? आणि असेल तर हा प्रकल्प कशाप्रकारे प्रत्यक्षात आणता येईल? याचा अभ्यास करत यासंबंधीचा सविस्तर अहवाल ६ आठवड्यांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.


मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची प्रतिक्षा

त्यानुसार कंपनीने अापला अहवाल नुकताच 'पीएमआरडीए'ला सादर केला असून अहवाल सकारात्मक असल्याचं अर्थात प्रकल्प व्यवहार्य असल्याचं अहवालात नमूद करण्यात आल्याचं गीते यांनी सांगितलं आहे. हा अहवाल 'पीएमआरडीए'कडे सादर झाला असून पुढच्या आठवड्यात हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला की त्वरीत प्रकल्पाच्या कामाला सुरूवात करण्यात येणार असल्याचंही गीते यांनी सांगितलं.



निधी उभारणी

सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करत खर्च काढण्यात येईल आणि त्यानंतर निधीची उभारणी कशी करता येईल यासंबंधीचाही अभ्यास करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेसाठी किमान ३-४ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्याअऩुषंगाने पुढील ६ महिन्यांत कामाला सुरूवात करत ८ वर्षांत प्रकल्पाचे काम पूर्ण होईल, असंही गीते यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा-

'हायपर लूपने १४ मिनिटांत पोहोचाल मुंबईहून पुण्याला'

मुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा