Advertisement

मुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय?


मुंबई-पुणे 14 मिनिटांत पोहोचवणारी हायपरलूप आहे तरी काय?
SHARES

हायपरलूप येणार, मुंबईहून पुण्याला 14 मिनिटांत पोहचवणार! जिकडं तिकडं सध्या चर्चा आहे ती याच हायपरलूपची! हायपरलूप प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल, पण हायपरलूपच्या प्राथमिक बातमीमुळे मुंबईकर आणि पुणेकर सुखावलेत हे नक्की. मात्र, त्याचवेळी हायपरलूप म्हणजे नेमकं काय? हाच प्रश्न अनेकांच्या मनात घोळत आहे. 250 किलोमीटरचं अंतर केवळ 14 मिनिटांत पार करणारं हे चमत्कारीक तंत्रज्ञान काय आहे? याची 'हायपर' चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.


बुलेट ट्रेनपेक्षाही तुफान वेग!

ही हायपरलूप सेवा बुलेट ट्रेनपेक्षाही वेगवान असणार आहे! कारण बुलेट ट्रेनप्रमाणे ताशी 300 किमी नव्हे, तर तब्बल 1000 किमी वेगानं ही हायपरलूप धावणार आहे! मुंबई ते पुणे अशी हायपरलूप सुपरफास्ट वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (पीएमआरडीए) चाचपणी सुरू केली आहे. त्यासाठी नुकताच हायपरलूप तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या व्हर्जिन हायपरलूप कंपनीशी करार केला आहे.



या करारानुसार मुंबई-पुणे हायपर लूप प्रकल्प राबवता येईल का? यासंबंधीचा प्राथमिक अभ्यास करत व्हर्जिन हायपरलूप सहा आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालातून हे शक्य असल्याचे स्पष्ट झाले तरच मग कुठे प्रत्यक्षात सविस्तर आराखडा तयार करून या प्रकल्पाचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं हायपरलूप प्रत्यक्षात यायला आणि त्यातून प्रवास करायला मुंबईकरांना आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल हा मोठा प्रश्नच आहे.




नक्की काय प्रकार आहे हायपर लूप?

  • अमेरिकेतील हायपरलूप वन कंपनीकडून हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आलं आहे
  • जगात कुठेही अजून हायपरलूप वाहतूक सेवा सुरू झालेली नाही
  • सध्या दुबई ते दोहादरम्यान हायपरलूपचे काम सुरू
  • अमेरिकेतील एका मार्गावर हायपरलूपचे काम पूर्ण, चाचणी सुरु
  • व्हर्जिन हायपरलूप वन भारतासह इतर देशातही ही वाहतूक सेवा विकसित करण्यासाठी प्रयत्नशील
  • हायपरलूप इलेक्ट्रॉनिक ट्रॅकवर व्हॅक्यूम पाईपमधून धावते
  • हायपरलूप मेट्रोप्रमाणे पिलरवरच उभी असते
  • व्हॅक्यूम पाईपमुळे हवेच्या वेगाइतकाच हायपरलूपचा वेग असतो
  • मुंबई-पुणे प्रवास केवळ 14 मिनिटांत होणार पूर्ण
  • या प्रवासासाठी प्रवाशांना मोजावे लागणार अंदाजे 1200 रुपये
  • हायपरलूपने तासाला अंदाजे 5000 प्रवासी करू शकणार प्रवास



धडधाकट असाल तरच हायपर लूपमध्ये बसाल!

ही घोषणा झाल्यापासून वाऱ्याच्या वेगात धावणाऱ्या हायपरलूपच्या बातमीने सुखावलेल्या अनेक मुंबईकरांना हायपरलूपमध्ये बसण्याचे वेध लागले असतील. पण थांबा...हायपरलूपमध्ये बसायचं असेल, तर तुम्ही तंदुरूस्त, धडधाकट असणं महत्त्वांचं आहे! कारण हायपरलूपचा वेग इतका प्रचंड असणार आहे, कि त्याची कल्पनाही तुम्ही करू शकणार नाहीत! त्यामुळे वाऱ्याच्या वेगाने प्रवास करायचा असेल, तर व्हर्टिगो, मायग्रेन, हृदयरोग, रक्तदाबासारखे आजार तुम्हाला नसावेत ही पहिली अट आहे!


बुलेट ट्रेनपेक्षा हायपर लूप स्वस्त!

बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप उभारणीसाठीचा खर्च कमी असल्याचीही चर्चा आहे. जिथे बुलेट ट्रेनच्या एका किमी मार्गाच्या बांधकामासाठी अंदाजे 650 कोटी खर्च येतो, तिथे हायपरलूपच्या एका किमी मार्गाच्या बांधकामासाठी 250 ते 275 कोटींचा खर्च येणार असल्याचं बोललं जात आहे.



हेही वाचा

'हायपरलूपने १४ मिनिटांत पोहोचाल मुंबईहून पुण्याला'


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा