Advertisement

हुश्श! बीकेसीतील हायब्रिड बस सुरूच राहणार, थकीत रकमेचा वाद मिटला

'एमएमआरडीए'कडे तगादा लावूनही थकीत रक्कम मिळत नसल्यानं बेस्टनं हायब्रिड सेवा बंद करण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. बेस्टच्या या भूमिकेनंतर 'एमएमआरडीए'ला जाग आली असून बेस्टला सव्वा दोन कोटी रुपये देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

हुश्श! बीकेसीतील हायब्रिड बस सुरूच राहणार, थकीत रकमेचा वाद मिटला
SHARES

बीकेसीत हायब्रिड बस सेवेसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (एमएमआरडीए)कडून बेस्टला अंदाजे सव्वा दोन कोटीचं देणं बाकी होतं. त्यासाठी 'एमएमआरडीए'कडे तगादा लावूनही ही रक्कम मिळत नसल्यानं बेस्टनं हायब्रिड सेवा बंद करण्याची आक्रमक भूमिका घेतली होती. बेस्टच्या या भूमिकेनंतर 'एमएमआरडीए'ला जाग आली असून बेस्टला सव्वा दोन कोटी रुपये देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हायब्रिड बस सेवा बंद होणार नाही, असा विश्वास 'एमएमआरडीए'नं व्यक्त केला आहे.


२५ हायब्रिड बस

बीकेसीतील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी 'एमएमआरडीए'नं इलेक्ट्रिकल हायब्रिड बस सेवा मार्च २०१८ मध्ये सुरू केली आहे. ५० कोटी रुपये खर्च करत एमएमआरडीएनं २५ हायब्रिड बस खरेदी केल्या आहेत. या बस वांद्रे स्थानक ते बीकेसी, बोरीवली-बीकेसी, ठाणे-बीकेसी अशा अन्य ठिकाणी धावत असून बीकेसीत नोकरीधंद्यासाठी येणाऱ्यांना या बसचा मोठा फायदा होत आहे.

वातानुकूलित हायब्रिड बसमध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. हा 'एमएमआरडीए'चा प्रकल्प असला तरी या हायब्रिड बसचं व्यवस्थापन आणि देखभाल पूर्णत: बेस्टकडून केली जात आहे. या बससाठी निधी देणं, बस खरेदी करून देण्याची जबाबदारी 'एमएमआरडीए' वर आहे.


बेस्टचा आक्रमक पवित्रा

बेस्ट-'एमएमआरडीए'तील कराराप्रमाणे 'व्हायबिलिटी गॅप फंडिंग'च्या रूपानं सव्वा दोन कोटींची रक्कम 'एमएमआरडीए'कडून बेस्ट येणं बाकी आहे. यासंबंधीची बिलं बेस्टकडून पाठवण्यात आली आहेत. तरीही ही रक्कम बेस्टला मिळत नसल्यानं आधीच तोट्यात असलेल्या सव्वा दोन कोटींचा भारही बेस्टसाठी डोईजड ठरत आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बेस्ट समितीच्या बैठकीत याचे पडसाद उमटले. ही रक्कम 'एमएमआरडीए'नं लवकर दिली नाही तर हायब्रिड बस सेवा बंद करू, असा आक्रमक पवित्रा बेस्टने दिला. त्यानंतर एक चांगली सेवा, बंद होते की काय? अशी भीती प्रवाशांना वाटू लागली.


'एमएमआरडीए' नरमली

याविषयी 'एमएमआरडीए'चे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बेस्टच्या सव्वा दोन कोटींच्या बिलाची रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही रक्कम लवकरच बेस्टकडे जमा होईल, अशी माहिती 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

तर बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनीही 'एमएमआरडीए'नं सव्वा दोन कोटीची रक्कम त्वरीत देण्यास होकार दर्शवला आहे. ही रक्कम आम्हाला लवकरच मिळेल असं स्पष्ट केलं आहे. एकूणच आता हा वाद मिटल्यानं हायब्रिड बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुटकेचा निश्वास टाकण्यास हरकत नाही असंच म्हणावं लागेल.



हेही वाचा-

Exclusive: पुण्यावरून थेट बीकेसीत १४ मिनिटांत, हायपरलूपचं शेवटचं स्थानक बीकेसी?

दुरुस्तीसाठी बंद केलेला वर्सोवा पूल वाहतुकीसाठी खुला



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा