...आणि सावंत ठरले देवदूत

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • सिविक

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरीवलीवरून चर्चगेटकडे निघालेली लोकल अंदाजे सव्वा सातच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकात पोहोचली. सकाळची वेळ असल्यानं लोकल नेहमीप्रमाणे प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. ही लोकल अंधेरी स्थानकावरून चर्चगेटच्या दिशेनं निघाली तोच समोर 100 फुटाच्या अंतरावर पूल कोसळताना मोटरमननं पाहिलं आणि त्वरीत इमर्जन्सी ब्रेक लावला. ब्रेक लावल्याबरोबर लोकल जिथल्या तिथं थांबली आणि लोकलमधील हजारो प्रवाशांचे जीव वाचले. सर्तकता दाखवत या हजारो प्रवाशांना वाचवणारा हा देवदूत आहे, या लोकलचे मोटरमन चंद्रशेखर सावंत.

सतर्कतेने जीव वाचवला

मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास अंधेरी रेल्वे स्थानकानजीकच्या गोखले पादचारी पुलाचा भाग अचानक कोसळला. हा भाग थेट अंधेरी रेल्वे रूळावर कोसळला आणि यात ७ जण जखमी झाले. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वे सेवा आणि अंधेरीतील रस्ते वाहतूक ठप्प झाली. संपूर्ण मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेत सुदैवानं कोणतीही जीवितहानी अद्यापपर्यंत झालेली नाही. पण जर मोटरमन सावंत यांनी वेळीत सतर्कता दाखवली नसती काय झालं असतं याचा विचारही न केलेला बरा.

देवानेच बुद्धी दिली

अंधेरी स्थानकावरून चर्चगेटच्या दिशेनं निघालो असताना समोरून पुलाचा भाग कोसळताना दिसला आणि आपल्याला देवानेच बुद्धी दिली नि आपण इमर्जन्सी ब्रेक लावल्याची प्रतिक्रिया मोटरमन सावंत यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

कौतुकास पात्र

पुलाचा भाग कोसळताना पाहणाऱ्या सावंत यांनी घाबरून न जाता इमर्जन्सी ब्रेक लावत हजारो प्रवाशांचे प्राण वाचवत मोठ्या दुर्घटनेपासून वाचवल्यानं त्याचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.


अंधेरीत पादचारी पुलाचा भाग कोसळला, अंधेरी विरार रेल्वे सेवा ठप्प

पश्चिम रेल्वे म्हणतेय, विरार-चर्चगेटदरम्यानचे सर्व पूल सुरक्षित


पुढील बातमी
इतर बातम्या