पुण्याने भौगोलिक क्षेत्रफळाच्या बाबतीत मुंबईलाही मागे टाकल्याने पुणे आता अधिकृतपणे राज्यातलं (maharashtra) सर्वाधिक भौगिलिक क्षैत्रफळ असलेलं शहर ठरलं आहे. पुणे महापालिकेच्या (pune municipal corporation) हद्दीत २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. बुधवारी राज्य सरकारने या हद्दवाढी संबंधीचा अध्यादेश जारी केला. यामुळे पुणे महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांच्या समावेशाची १९९७ मध्ये सुरू झालेली प्रक्रिया अखेर २४ वर्षांनंतर पूर्ण झाली.
पुणे महापालिका हद्दीत २३ गावांचा समावेश करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने जानेवारी महिन्यात काढली होती. त्यानंतर गावांच्या समावेशाबाबत हरकती-सूचना नोंदविण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. यावरील हरकती-सूचनांवरील प्रत्यक्ष सुनावणी विभागीय आयुक्त कार्यालयाकडून घेण्यात आली होती. त्याबाबतचा अहवाल राज्य शासनाला विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पाठविण्यात आला. या अहवाला संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत २३ गावांचा समावेश तातडीने पुणे महापालिका हद्दीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार यासंदर्भातील अध्यादेश काढण्यात आला. या हद्दवाढीनंतर पुणे शहराचं भौगोलिक क्षेत्रफळ वाढून ५१६.१६ चौरस किलोमीटर इतकं झालं आहे. या तुलनेत मुंबईचं भौगोलिक क्षेत्रफळ ४४० चौरस किलोमीटर इतकंच राहीलं आहे. नव्या हद्दवाढीमुळे पुणे आता देशातील सर्वात मोठ्या शहरांपैकी सातव्या क्रमांकाचं शहर बनलं आहे.
हेही वाचा- मुलांमधील अँटीबॉडीच्या चाचणीसाठी ५ वे सर्वेक्षण
महत्त्वाची गोष्ट अशी की, पुणे महापालिकेचं २०२१-२२ या वर्षाचं बजेट ८,३७० कोटी आहे. तर मुंबई महापालिकेचं (bmc) बजेट ३९,०३८ कोटी आहे. महापालिकेत समाविष्ट झालेली यापूर्वीची ११ आणि सध्याची २३ गावे विकासापासून वंचित राहू नयेत, यासाठी ९ हजार कोटी रुपयांची महापालिकेला तातडीने मदत करावी, अशी मागणी महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे.
खालील गावं पुणे (pune) शहरात समाविष्ट करण्यात आलेली आहेत: म्हाळुंगे ,सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे- हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली.
वरील सर्व गावांच्या संपूर्ण महसूल क्षेत्राचा समावेश पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत करण्यात येणार आहे.
(area wise pune municipal corporation becomes biggest corporation in maharashtra after including 23 villages in city)