Advertisement

देवळं बंद असताना डॉक्टर्सच्या रूपाने देवदूत आपल्यात होते, उद्धव ठाकरे यांचं भावनिक पत्र

कोविड काळात देवळे आणि धार्मिक स्थळे बंद होती मात्र डॉक्टर्सच्या रूपाने देवदूत आपल्यात होते अशी माझी भावना आहे. अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय डाॅक्टर दिवसाच्या निमित्ताने डाॅक्टरांच्या कार्याचा गौरव केला.

देवळं बंद असताना डॉक्टर्सच्या रूपाने देवदूत आपल्यात होते, उद्धव ठाकरे यांचं भावनिक पत्र
SHARES

कोविड काळात देवळे आणि धार्मिक स्थळे बंद होती मात्र डॉक्टर्सच्या रूपाने देवदूत आपल्यात होते अशी माझी भावना आहे. या डॉक्टर्सचा पूर्ण सन्मान करणे आणि त्यांच्याप्रति आदर बाळगणे, त्यांच्या बाबतीत कुठलीही हिंसात्मक कृती होऊ नये याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे , अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राष्ट्रीय डाॅक्टर दिवसाच्या निमित्ताने डाॅक्टरांच्या कार्याचा गौरव केला.

डॉ. बी. सी. रॉय यांच्या स्मरणार्थ १ जुलैला राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्ता उद्धव ठाकरे यांनी डाॅक्टरांना उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी डॉक्टरांमुळेच कोविडविरुद्धच्या लढ्याचा गोवर्धन पेलणं शक्य झाल्याचं म्हणत डाॅक्टरांना शुभेच्छा दिल्या.

त्यांनी पुढं म्हटलं आहे की, मागील वर्ष दीड वर्षांपासून आपण सगळे कोरोनाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेच्या उतारावर उभे आहोत. आज काही प्रमाणात संसर्गाचं प्रमाण कमी झालेलं दिसत असलं तरी संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारीही अधिक वाढली आहे. आजपर्यंत कोविडचा लढा आपण लढलो ते तुम्हा डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या योद्ध्यांमुळे, आणि पुढंदेखील हे आव्हान आपण पेलणार आहोत ते आपल्याच भक्कम साथीने, असा विश्वास मला आहे.

हेही वाचा- डॉ. तात्याराव लहाने शासकीय सेवेतून निवृत्त

हे युद्ध वेगळं

कोविडची (covid19) महामारी ही रोज घडणारी गोष्ट नसते. अशा घटना, अशी महामारी कित्येक वर्षातून एकदा येते आणि तिच्याशी झुंजताना तुमचा माझा सगळ्यांचा कस लागतो. सीमेवरील युद्ध वेगळं असतं. तिथं शत्रू आपल्यासमोर असतो पण कोविडसारख्या रोगराईविरुद्धचं युद्ध ही वेगळी गोष्ट आहे. इथं शत्रू डोळ्यांनी दिसतदेखील नाही आणि तरीही लढाई सुरू आहे. रुग्णांचे सर्वेक्षण, प्रयोगशाळेतील चाचण्या रुग्णांवरील उपचार या साऱ्या बाबी जीवावर बाजी लावून आपण सारे करीत आहोत कारण हा अदृश्य शत्रू कधी कोणावर झडप घालेल हे सांगता येत नाही.

सर्वस्व पणाला 

कोविडच्या या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत डॉक्टर म्हणून या कोविड विरोधी युद्धातील आघाडीचे योद्धे म्हणून आपण सर्वांनी जे मोलाचं योगदान दिलं आहे, ते शब्दातीत आहे. मी मधल्या काळात आपणाशी वेगवेगळ्या निमित्ताने संवाद साधला आहे, आपल्या सूचनादेखील ऐकून घेतल्या आहेत. डॉक्टर, मग ते सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत की खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणारे असोत, प्रत्येकाने जीवाची बाजी लावून आलेल्या प्रत्येक रुग्णाला जीवदान देण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलं आहे. महाराष्ट्र (maharashtra) ही लढाई तुमच्याशिवाय लढू शकत नव्हता आणि लढू शकणार नाही.

दुसऱ्याच दिवशी रणांगणात

कोविडविरुद्धच्या या लढाईमध्ये अनेक डॉक्टरांनी आपले प्रण देखील गमावले आहेत, आपले कुटुंबीय गमावले आहेत. घरातील जिवलग व्यक्ती कोविडमध्ये मृत्युमुखी पडल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा आपल्या रणांगणात, आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी रुजू झालेले डॉक्टर मी पाहिले आहेत. महिना महिना घराकडे पाठ फिरवून निव्वळ रुग्णसेवेला वाहून घेतलेले डॉक्टर्स मी पाहिले आहेत. हे सगळे शब्दांत मांडता येणार नाही. या कठीण काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेला तुम्ही जो मोलाचा आधार दिला आहे, त्याबद्दल महाराष्ट्र आपला सदैव कृतज्ञ राहील.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा