टोळ किटक माणसांसाठी धोकादायक? जाणून घ्या टोळ किटकाबद्दल या १० गोष्टी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या कोरोनाव्हायरसनं जगभर थैमान तर घातलंच आहे. आता आणखी एक असमानी संकट काही देशांवर घोंघावतंय. हे संकट आहे टोळ अर्थात इंग्रजीमध्ये त्याला Locusts म्हणतात. महाराष्ट्रात देखील या किटकानं शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भितीचं वातावरण आहे. नेमका हा किटक आहे तरी काय? त्यापासून काही धोका आहे का? कशाप्रकारे हा हल्ला करतो? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. यावर आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

Locusts शब्दाचा अर्थ

या लॅटिन शब्दाचा अर्थ आहे 'जळालेली जमिन'. म्हणजेच जिथं ही टोळधाड पडते, त्या भूप्रदेशातली पिकं पूर्णपणे उध्वस्त होतात. विशेष म्हणजे जगातला कुठलाच देश या टोळ धाडीपासून सुरक्षित नाही. अगदी प्राचिन साहित्य आणि बायबलमध्येही या टोळधाडीच्या उपद्रवाचा उल्लेख आहे.

टोळधाड (Locusts Attack) म्हणजे काय?

टोळधाड हा शब्द शेतीवर हल्ला करणाऱ्या किटकांविषयी वापरला जातो. 'टोळ' हा एक नाकतोडा प्रजातीचा उपद्रवी किटक आहे. तो हिरवी पानं खातो. याचं तोंड घोड्यासारखं असल्यानं त्याला विदर्भात 'घोड्या' असंही म्हटलं जातं.

सगळ्याच प्रकारच्या वनस्पतींना धोकादायक ठरणारे हे टोळ किटक करोडोंच्या संख्येनं एखाद्या प्रदेशावर हल्ला करतात. बघता बघता शेतातली उभी पिकं खाऊन टाकतात. आणि या यामुळं शेतीचं होणारं नुकसानाचं प्रमाण हे अतिशय मोठं असतं. यापैकी वाळवंटी टोळ, प्रवासी टोळ, मुंबई टोळ या जाती; विशेषतः यातली वाळवंटी टोळ भारतात सर्वाधिक नुकसान घडवते.

माणसांना धोका आहे का?

 टोळचं प्रमुख खाद्य हे हिरवा चारा आहे. अनेकदा टोळ शेतच्या शेत साफ करतात. याचा परिणाम शेतीवर आणि अन्न पुरवठ्यावर होऊ शकतो. 

टोळ माणसांवर हल्ला करत नाहीत किंवा तो माणसांना चावत नाही. दुसरा म्हणजे या किटकांपासून रोगराई पसरण्याचा उल्लेख रोमन इतिहासकार लिवी यानं इसवीसनपूर्व २०३ मध्ये केला आहे. चीनमध्ये इसवीसन ३११ मध्ये टोळढाडीमुळे रोगराई पसरली होती. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला होता, असा त्यावेळी दावा करण्यात आला होता.    

टोळ किटकाचं वैशिष्ट्य

  • धोळधाडीतील किटकांचं आयुष्य फार लहान असतं. फक्त ९० दिवसांचं असतं. केवळ तीन ते चार महिने ते जिवंत राहू शकतात.
  • एक टोळ किटक एका दिवसात स्वतःच्या वजनाएवढं अन्न फस्त करतो आणि सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यन्त तो सतत खात राहतो. एका छोट्या टोळधाडीचा विचार केला तर ती सुमारे तीन हजार लोकांचं अन्न खाऊन जाते
  • टोळधाड शेतावर पडली तर दिवसभर खातच असते. सुर्योदयापासून ते सुर्यास्तापर्यंत टोळधाड खातच असते.
  • वातावरणातील बदलांशी जुळवून घेण्याची आणि मोठं स्थलांतर करण्याची क्षमता यांच्यात असते. वाहणाऱ्या वाऱ्याच्या दिशेनं हा थवा प्रवास करतो.
  • टोळ किटक हे हवेतल्या हवेत एका श्वासात १५० किलोमीटर अंतर कापू शकतात. समजा जर या टोळधाडीला हिंद महासागर पार करायचा असेल तर त्यांना सुमारे ३०० किलोमीटर अंतर पार करावं लागेल. त्यामुळे अनेकदा टोळधाडीचे अनेक किटक समुद्र पार करताकरताच बुडून जातात.
  • टोळ्यांच्या एक थव्यात जवळपास ८० लाखांहून जास्त किटक असतात आणि हा थवा ८०० चौ.कि.म पर्यंतचा विस्तिर्ण भूप्रदेश व्यापू शकतो.
  • टोळधाड शिकारी पक्ष्यांपासून बचाव करण्यात सक्षम असते. डोळ्यासमोर संवेदनशील यंत्रणा असल्यानं धोक्याची चाहूल लागताच टोळधाड रस्ता बदलते.
  • एक मादी टोळ ३०० ते ५०० अंडी घालते. साधारण दोन आठवड्यात पिले बाहेर येतात. ही पिले २८ दिवसात पाचवेळा सापासारखी कात टाकतात. त्यानंतरच ती प्रौढावस्थेत जातात.
  • टोळांचा जीवनक्रम तीन टप्प्यात होतो. अंडी, त्यानंतर बाहेर पडणारे पिले आणि तिसरे म्हणजे पंखासह येणारं टोळ.
  • टोळांची प्रजोत्पदन क्षमताही तितकीच ‌मोठी असते. एका वर्षात टोळांच्या २ ते ४ पिढ्या तयार‌ होतात.

'इथून' होते भारतात घुसखोरी

भारतात अनेकवेळा लहान मोठ्या टोळधाडी होऊन गेल्या आहेत. वाळवंटी टोळांचं मूळ स्थान हे सौदी अरेबिया किंवा अरेबियन द्विपकल्प आहे. मान्सुनच्या वाऱ्यांमागोमाग ते पाकिस्तानमार्गे राजस्थान आणि गुजरातमध्ये प्रवेश करतात.

पण‌ वातावरणातील बदलामुळे जिथं पाच वर्षातून एकदा चक्रीवादळ यायचं, त्या अरबी समुद्रात मागच्या दोन वर्षापासून एकाच वर्षात २ ते‌ ३ चक्रीवादळं निर्माण होतायेत. चक्रिवादळामुळे पाऊस पडतो. त्यामुळे त्याच प्रदेशात टोळांना खाद्य आणि प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण मिळतं. म्हणून त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होते.

टोळ किटकांचे क्षत्रू

  • सर्कोफॅजिडी प्रजाती माश्या या टोळ्यांच्या क्षत्रू आहेत. या माश्या टोळ किटकाच्या शरीरावर अळ्या सोडतात. या अळ्या टोळ किटकांच्या शरीरात घुसून आपली उपजिवीका करतात.
  • ससे, अंदीर, घुशी, खारी सायाळ आदी प्राणी पण टोळ खातात.
  • माळढोकसह अनेक प्रकारचे पक्षी टोळ खातात.
  • साप, सर्डा आणि पाल पण टोळांचे क्षत्रू आहेत

... म्हणून पक्ष्यांचं संवर्धन आवश्यक

माळढोक सारखे अनेक पक्षी टोळ किटकाचे क्षत्रू आहेत. पण माळढोक पक्षी तर महाराष्ट्रातून हद्दपार झाला आहे. अन्य प्रदेशातही या पक्ष्याची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे टोळ किटकाला आता मोकळं रान मिळालं आहे.

खाद्य म्हणून किटकांचा वापर

काही देशांमध्ये हे किटक खाद्य आहे. आफ्रिका, मध्य पूर्वेतील देश, आशिया खंड इथं किटकांचा भोजन म्हणून उपयोग केला जातो. साधारणपणे फ्राय करतात किंवा वाफेवर शिजवले जातात.


हेही वाचा

मुंबईत 'टोळ' की अफवांची टोळी? खरं की खोटं जाणून घ्या फॅक्ट चेक

पुढील बातमी
इतर बातम्या