सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी ‘आश्रय योजना’

  • मुंबई लाइव्ह टीम & सीमा महांगडे
  • सिविक

मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वसाहतींसाठी ‘आश्रय योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सुमारे २८ हजार सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून सदनिका उपलब्ध करून देणे नियोजित आहे. सद्यस्थितीत ३९ ठिकाणी असलेल्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करायचे नियोजित असल्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.

'कामगारांच्या प्रश्वावर शासन गंभीर'

भाई गिरकर यांनी महानगरपालिका क्षेत्रातील सफाई कामगारांच्या वसाहतींच्या धोरणांविषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. 'सफाई कामगारांच्या प्रश्नांविषयी शासन गंभीर असून या वसाहतीसंदर्भातील तांत्रिक अडचणी लवकरात लवकर दूर करण्यात येतील. सफाई कामगारांना सफाईची कामे करावी लागत असल्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. त्यांचे आयुर्मान कमी होत असल्यामुळे त्यांना स्वच्छ वसाहती उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तसेच, सफाई कामगारांच्या मेडिक्लेमचा हप्ता भरण्यात आला नसल्यास तो तातडीने भरण्यात येईल', असे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

अर्थसंकल्पात ४४.७३ कोटींची तरतूद

या पुनर्विकासाच्या कामासाठी 2017-18 च्या अर्थसंकल्पात 36.2 कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. तर यंदाच्या अर्थसंकल्पात त्यासाठी 44.73 कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती रणजित पाटील यांनी दिली.


हेही वाचा

सफाई कामगारांना द्या पौष्टीक आहार

पुढील बातमी
इतर बातम्या