राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे आमदार झीशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा समोर आला आहे. ही धमकी सोशल मीडियावरील व्हॉइस नोटद्वारे देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ही व्हॉइस नोट बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि फरार गँगस्टर झीशान अख्तर याने पाठवल्याचा आरोप आहे. झीशान अख्तर सध्या परदेशात लपल्याचा संशय असून तो मुंबई गुन्हे शाखेसह विविध तपास यंत्रणांना हवा आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हॉइस नोटमध्ये संबंधित व्यक्तीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला आहे. तसेच झीशान सिद्दीकी यांना उद्देशून, "तुझ्या वडिलांची हत्या मी केली, आता तुझी पाळी आहे. तू माझ्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करत आहेस. जितकं क्राइम ब्रांचकडे धावशील तितकं धाव. तुझ्याविरोधात फतवा जारी केला आहे. सुरक्षा वाढवून घे," अशी धमकी दिल्याचे समोर आले आहे.
मात्र, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कथित धमकीबाबत झीशान सिद्दीकी किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल केलेली नाही.
सध्या झीशान सिद्दीकी हे भारताबाहेर असून, त्यांच्या परतल्यानंतर त्यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबई गुन्हे शाखेने व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपची तांत्रिक पडताळणी सुरू केली असून, तिची सत्यता आणि मूळ स्रोताचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा