अखेर शिक्षण महर्षींच्या 'त्या' तुटलेल्या पाटीची दुरूस्ती

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

शिवसेना भवनजवळील शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांच्या नामफलकाच्या पाटीची दुरूस्ती अखेर मुंबई महापालिकेने करून करून घेतली आहे. या नामफलकाच्या पाटीची दुरवस्था झाल्याचे वृत्त 'मुंबई लाईव्ह'ने दिल्यानंतर याची दखल घेऊन पालिकेने याची डागडुजी करत पाटीही लक्षवेधी बनवली आहे. दरम्यान, या नामफलकाचा परिसर सुशोभित करून त्याची देखभाल करण्याची तयारी बालमोहन शाळेने दर्शवली आहे. यासाठी लवकरच रीतसर अर्ज केला जाणार आहे.

शिक्षण महर्षींच्याच नामफलकाकडे दुर्लक्ष

शिवसेना भवन येथील राम गणेश गडकरी चौक बेस्ट आगार ते सेनापती बापट यांचा पुतळा याठिकाणी जाणाऱ्या रस्त्याला शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणाची पाटी सेनाभवनच्या सिग्नलजवळ बसवण्यात आली आहे. शालेय पाटीच्या आकारात लक्षवेधी नामकरणाचा फलक विटांचे बांधकाम करून बसवण्यात आला होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पाटीच्या खालील विटांचा भाग निखळून पाटीचा फलक तुटलेल्या अवस्थेत पडला होता. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही पाटी निखळून पडण्याची शक्यता होती.

पाटीवर पानाच्या पिचकाऱ्या

विशेष म्हणजे या नामकरणाच्या पाटीची देखभाल महापालिकेकडून योग्य प्रकारे केली जात नसल्याने या पाटीवरच पानाच्या पिचकाऱ्या मारून ती रंगवण्यात आली होती. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या शिवाजी पार्ककर आणि दादरकरांना शरमेने मान खाली घालून जावी लागत होती. याबाबत 'मुंबई लाईव्ह'ने सोमवारी २२ जानेवारीला ‘दादरमध्येच शिक्षण महर्षींच्या नावाची पाटी तुटली’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अखेर महापालिकेच्या जी-उत्तर विभागाचे प्रभारी सहायक आयुक्त अशोक खैरनार यांनी अधिकाऱ्यांना आदेश देत तातडीने या पाटीची दुरुस्ती करून घेतली.

नामफलकाचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने दुरूस्तीचे आदेश दिले. या विभागाचा पदभार मी काहीच दिवसांपूर्वी घेतला आहे. त्यामुळे विभागातील प्रत्येक समस्या मी जाणून घेत असून समोर येणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न मी करत आहे.

अशोक खैरनार, सहायक आयुक्त, जी-साऊथ

पुढील बातमी
इतर बातम्या