Advertisement

दादरमध्येच शिक्षण महर्षींच्या नावाची 'पाटी' तुटली


दादरमध्येच शिक्षण महर्षींच्या नावाची 'पाटी' तुटली
SHARES

शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांचं कार्य नव्या पिढीच्या स्मरणात राहावं म्हणून शिवसेना भवनजवळील रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. परंतु या रस्त्याच्या नावाची पाटीच निखळून पडल्याने 'शाळा सुटली, पाटी फुटली' ही ओळ आठवल्याशिवाय रहात नाही. मात्र ही तुटलेली पाटी नीट करण्याकडं ना स्थानिक नगरसेविकेचं लक्ष आहे, ना महापालिका प्रशासनाचं!


ज्ञानदानाचं कार्य

शिवाजी पार्कमधील बालमोहन विद्या मंदिर शाळेच्या माध्यमातून शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांनी ज्ञानदानाचं कार्य करत भावी पिढी घडवली. बालमोहन शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवला. शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, व्यवसाय तसंच राजकारण या क्षेत्रातही बालमोहनचे माजी विद्यार्थी आघाडीवर आहेत. त्यामुळे या शाळेचे संस्थापक दादासाहेब रेगे यांचा गौरव करत शिवसेना भवन जवळील रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं.


कुठे आहे पाटी?

शिवसेना भवन येथील राम गणेश गडकरी चौक बेस्ट आगार ते सेनापती बापट यांचा पुतळा अशा रस्त्याला शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांचं नाव देण्यात आलं आहे. या नामकरणाची पाटी सेनाभवन भवन सिग्नल जवळ आणि चंद्रगुप्त हॉटेल शेजारी बसवण्यात आली आहे.


अवस्था काय?

शालेय पाटीच्या आकारात लक्षवेधी नावाचा फलक विटांचं बांधकाम करून बसवण्यात आला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून खालील विटांचा भाग निखळून पाटीचा फलक कधीही खाली पडेल, अशा बेतात कलला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी ही पाटी निखळून पडण्याची शक्यता आहे.

या पाटीची देखभाल महापालिका योग्य प्रकारे करत नसल्याने या पाटीवर पानाच्या पिचकाऱ्या मारून ती रंगवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या दादरकरांना शरमेने मान खाली घालून जावं लागत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा