मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा वांद्रे तलाव (Bandra Talao) या 7.5 एकर क्षेत्रफळाच्या ग्रेड-II वारसा तलावाचे संपूर्ण पाणी काढण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) कडून मोठ्या प्रमाणावर पुनरुज्जीवन आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
पूर्वी पाण्याने भरलेला तलाव आता चिखल, गाळने व्यापलेला दिसत आहे. तलाव परिसरात मोठी यंत्रसामग्री आणि पंपांच्या सहाय्याने साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. पहिल्या टप्प्यात तलावातील संपूर्ण पाणी बाहेर काढून अनेक वर्षांपासून साचलेला गाळ आणि कचरा हटवण्याचे काम सुरू आहे.
दुसऱ्या टप्प्यात तलाव परिसराचे सुशोभीकरण तसेच नागरिकांसाठी अधिक चांगल्या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांत तलावासमोर गंभीर पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या होत्या. तलावाच्या सविस्तर प्रकल्प अहवालादरम्यान करण्यात आलेल्या अभ्यासात पाण्यातील बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (BOD) जवळपास 100 mg/litre इतकी आढळली होती, जी निरोगी जलस्रोतासाठी अपेक्षित 5 mg/litre पेक्षा खूपच जास्त आहे.
तलावात थेट सांडपाणी सोडले जात नसले तरी परिसरातील भूमिगत गटारवाहिन्यांमधून होणाऱ्या गळतीमुळे पाण्याची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात खालावल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
तलावातील पाणी काढताना कोणतेही जिवंत जलचर आढळले नाहीत. मात्र दोन मृत कासव आढळल्याने तलावाच्या बिघडलेल्या पर्यावरणीय स्थितीची गंभीरता समोर आली आहे.
तलावाचे दीर्घकालीन आरोग्य सुधारण्यासाठी महापालिकेकडून येथे दररोज 10 लाख लिटर क्षमतेचा (1 MLD) सांडपाणी प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी तलावात सोडण्यात येईल. यामुळे पाण्याची हालचाल वाढेल, स्थिरता कमी होईल आणि ऑक्सिजनचे प्रमाण सुधारण्यास मदत होईल.
या पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे मुंबईतील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेल्या बांद्रा तलावाची पर्यावरणीय स्थिती आणि सौंदर्य मोठ्या प्रमाणात सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी नुकतीच या कामाची पाहणी केली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, बांद्रा तलाव हा केवळ जलाशय नसून बांद्र्याच्या ओळखीचा आणि संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे.
तसेच काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तलावातील गाळ काढण्याचे काम मागील जवळपास दोन आठवड्यांपासून सुरू आहे.
हेही वाचा