महाराष्ट्रातील जनतेला झटका, वीज दरात मोठी वाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी (Electricity Rate Increase) करावी लागणार आहे. त्यामुळे या दर वाढीचा थेट फटका राज्यातील ग्राहकांना बसणार आहे.

  • 0 ते 100 युनिट आधी 10 पैसे, आता 65 पैसे
  • 101 ते 300 युनिट आधी 20 पैसे , आता 1 रुपये 45 पैसे
  • 301 ते 500 युनिट आधी 25 पैसे, आता 2 रुपये 05 पैसे
  • 501 युनिटच्या वर आधी 25 पैसे, आता 2 रुपये 35 पैसे

कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील पाच महिन्यासाठी ही दरवाढ करण्यात आली आहे.

मार्च 2022 ते मे 2022 पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सध्याचा FAC वाढवला आहे. जानेवारी 2022 मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट 25 पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.

वीजेच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे आधीच महागाईच्या गर्तेत अडकलेल्या सामान्य जनतेच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. नुकतेच गॅसचे दर देखील 50 रूपयांनी वाढले आहेत. वाढत्या महागाईमुळे बजेट कोलमडलं आहे.

गेल्या एका वर्षात उर्जेचा वापर सुमारे 25 टक्क्यांनी वाढला आहे आणि सर्वोच्च मागणीही 15 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी दिली.

“देशांतर्गत कोळसा उत्पादन पुरेसं नसल्यामुळे ब्लॅकआउट टाळण्यासाठी आम्ही वीज प्रकल्पांना 10 टक्के आयातित कोळसा मिसळण्यास सांगितले आहे. आयातित कोळशाची किंमत 17,000-18,000 रुपये प्रति टन आहे, तर देशांतर्गत कोळशाची किंमत सुमारे 2,000 रुपये प्रति टन आहे. यामुळे, त्याचा परिणाम प्रति युनिट सुमारे 60-70 पैशांनी होईल, ”सिंग म्हणाले.


हेही वाचा

पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनाला स्टिकर्स, वाहतूक पोलिसांची मोहीम

पुढील बातमी
इतर बातम्या