अभिनेत्री माधवी जुवेकरला नागिन डान्सचा डंख; बेस्टनं केलं सेवेतून बडतर्फ

बेस्ट कार्यालयातील सत्यनारायणाच्या पूजेत केलेलं नृत्य अभिनेत्री माधवी जुवेकर यांना चांगलंच भोवलं आहे. गेल्या वर्षी करमणुकीच्या कार्यक्रमादरम्यान माधवी यांनी सादर केलेल्या नृत्यावर नोटांची उधळण झाली होती. त्या प्रकरणी शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत बेस्टच्या चौकशी समितीनं माधवी यांच्यासह ७ जणांना सेवेतून बडतर्फ केलं आहे. मात्र यात आपली कोणतीही चूक नसल्याचं सांगत या विरोधात अपील केल्याचं माधवी यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं.

कधी केला होता डान्स?

गेल्या वर्षी २९ सप्टेंबर रोजी बेस्टच्या वडाळा येथील कार्यालयात आयोजित एका अंतर्गत कार्यक्रमात माधवी मुक्तपणे नृत्य करताना त्यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आली होती. या विरोधात एका निनावी पत्राद्वारे माधवी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत बेस्टने २०आय या नियमाचा भंग केल्याप्रकरणी माधवी यांच्यासह ७ जणांवर कारवाई केली आहे.

आरोप खोटे

आपल्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असल्याचं माधवी यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या की, मला आरोप मान्य नाहीत. या विरोधात मी अपीलही केलं आहे. मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही. एका साध्याशा प्रकारणाला राजकीय रंग देऊन कुभांड रचण्यात आलं आहे.

आमचे स्वत:चे पैसे

त्या कार्यक्रमात आमची एक थीम होती. त्यात एका मुलीसोबत मी कच्छी डान्स केला होता. त्यासाठी आम्ही कोणाकडूनही वर्गणी मागितली नव्हती. आम्ही स्वत:च पैसे जमा केले होते. माझा कोणावरही संशय नाही. बेस्टच्या कार्यप्रणालीवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी केवळ इथे क्लार्क नसून, बेस्टची ब्रँड अॅम्बेसेडरही आहे. त्यामुळे मी माझं काम सुरूच ठेवेन.


हेही वाचा-

वडाळा आगार की डान्सबार? अभिनेत्री माधवी जुवेकरवर उडवले पैसे!

माधवी जुवेकरला बेस्टकडून नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या