मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमुळेच हे शक्य, इक्बाल सिंह चहल यांचं मोठं विधान

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या कोरोनाविरोधातील लढ्याचं सर्वोच्च न्यायालयासह देशपातळीवर कौतुक होत आहे. या लढ्याचं नेतृत्व करणारे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचंही सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य होत असल्याचं म्हणत चहल यांनी आपल्या यशाचं श्रेय मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.

एका मुलाखतीत इक्बाल सिंह चहल यांनी हे वक्तव्य केलं आहे. आर्थिक राजधानी मुंबईत (mumbai) कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. राजकीय स्तरातून टीका करण्यात येत होती. देशाची आर्थिक राजधानी असल्याने सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे लागलं होतं. अशा वेळेस होत असलेल्या राजकारणाला वरचढ ठरू न देता प्रशासकीय पातळीवर जबाबदाऱ्यांची विभागणी कशी केली? 

या प्रश्नावर उत्तर देताना इक्बाल सिंह चहल म्हणाले की,अनेक गोष्टींसाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो. पहिली गोष्ट म्हणजे मला असे मुख्यमंत्री मिळाले ज्यांनी मला निर्णय घेण्यासंदर्भातील स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मी आवश्यक निर्णय तातडीने घेऊ शकतो. हे स्वातंत्र्य इतर अनेक शहरांमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना नाही. 

हेही वाचा- आता नीती आयोगानेही केलं मुंबई माॅडेलचं कौतुक!

दुसरी गोष्ट म्हणजे मी गेल्या वर्षी मे महिन्यात मुंबई महापालिकेत कार्यरत झालो. तेव्हा कोरोनाचा विषाणू लवकर आपला निरोप घेणार नाही,  असं माझ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना स्पष्ट केलं होतं. आपल्याला एका मोठ्या लढाईसाठी तयारी करणं गरजेचं आहे. ही तयारी कदाचित एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी असेल, असं मी त्यांना पटवून दिलं. तेव्हापासूनच आम्ही यंत्रणा उभारण्यास सुरुवात केली. आता या सर्व यंत्रणा जवळजवळ ऑटो पायलट मोडवर काम करत आहेत. सद्यस्थितीत दिवसाला २ हजार काय १० हजार कोरोना रुग्ण जरी शहरात आढळून आले तरी यंत्रणांवर ताण पडत नाही. यंत्रणा नियोजित पद्धतीने अगदी बरोबर काम करते. मला कोणाचाही कशासाठीही फोन येत नाही, असं उत्तर इक्बाल सिंग यांनी सांगितलं.

दरम्यान, “केंद्रीय पद्धतीने बेडचं वाटप, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणं, इतकंच नाही तर खासगी रुग्णालयातील बेडचंही वाटप करणं आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड तयार करणं, रुग्णांच्या तब्येतीबद्दल पाठपुरावा करण्यासाठी वॉर रुम कार्यान्वित करणं. मुंबईचं कोरोना व्यवस्थापन मॉडेल प्रेरणादायी आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि त्यांच्या ग्रेट टीमचं अभिनंदन,” अशा शब्दांत नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि आयुक्तांचं कौतुक केलं आहे.

तर सर्वोच्च न्यायालयाच्या टिपण्णीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोरोनाविरोधातील लढ्याचं कौतुक केलं होतं.

हेही वाचा- सर्वोच्च न्यायालयाकडून महापालिकेचं कौतुक, भाजप मात्र विरोधाचीच ढोलकी बडवतंय- महापौर
पुढील बातमी
इतर बातम्या