मुंबईत केवळ ३६ टक्के नालेसफाई पूर्ण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत केवळ ३६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली असल्याची माहिती समोर येतेय. मुंबई पालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यानंतर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी १६२ कोटी रुपयांची नालेसफाईची कामे मंजूर केली आहेत.

मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याचे ४ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांना आठवड्यातून दोनदा आपल्या हद्दीतील नाल्यांची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

पावसाळा जवळ आल्यानं पालिकेने शहरात पावसाळ्यापूर्वी नाले सफाई आणि रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचू नये, यासाठी दरवर्षी मे महिन्यात नाल्यांची साफसफाई आणि खराब रस्ते दुरुस्तीचे काम मनपाकडून सुरू होते.

दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे ३४० किलोमीटर लांबीचे लहान व मोठे नाले व नदी आहे. त्यांची पावसाळ्यापूर्वी निर्धारित वेळेत योग्य प्रकारे साफसफाई व्हावी, यासाठी दर वर्षीप्रमाणे एका पाळीमध्ये काम न करता यंदा दोन पाळ्यांमध्ये काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले.

नालेसफाईच्या कामात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने भरारी पथके तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. नालेसफाईनंतर काढण्यात आलेला गाळ उचलण्यापूर्वी व निर्धारित ठिकाणी गाळ टाकण्यापूर्वी वजन करण्यासह दोन्ही वेळचे चित्रीकरण करण्याचेही निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


हेही वाचा

वर्सोवा-वांद्रे सीलिंकचे काम पावसाळ्यानंतर सुरू होणार

ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पालिका लवकरच सायकल ट्रॅक उभारणार

पुढील बातमी
इतर बातम्या