घाटकोपरच्या लक्ष्मीबाग नाल्यावरील अतिक्रमणांवर हातोडा

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

घाटकोपरमधील लक्ष्मीबाग नाल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण होत आली असून आता दुसऱ्या टप्प्यातील कामालाही सुरूवात करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण २९७ झोपड्यांपैकी सुमारे ५० झोपड्यांवर मंगळवारी बुलडोझर चढवण्यात आला आहे.

नाल्याचं रूंदीकरण

२००५ च्या महापुरानंतर मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण करण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत घाटकोपरमधील लक्ष्मीबाग नाला आणि सोमय्या नाल्यांच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्याचं निश्चित केलं होतं. परंतु मागील १० वर्षांपासून रखडलेल्या लक्ष्मीबाग नाल्यांवरील अतिक्रमणाचा विळखा सोडवून त्याच्या रुंदीकरणाचं काम महापालिकेच्या एन विभाग कार्यालयाचेवतीने हाती घेण्यात आलं आहे. लक्ष्मीबाग नाल्याच्या रुंदीकरणाचे काम तीन टप्प्यात विभागण्यात आलं आहे.

१३१ झोपड्यांवर कारवाई

पहिल्या टप्प्यातील १३१ झोपड्यांवर कारवाई करून येथील नाल्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केलं असून यामध्ये बाधित असलेल्या २९७ बांधकामांपैकी सुमारे ५० बांधकामांवर मंगळवारी एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करून ते जमीनदोस्त करण्यात आली आहे.

माहुलमध्ये पुनर्वसन

दुसऱ्या टप्प्यातील कारवाईत २९७ बांधकामांची पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये १३२ बांधकामे पात्र ठरली आहे. त्यानुसार यासर्वांचं पूनर्वसन माहुल येथील प्रकल्पबाधितांच्या वसाहतींमध्ये करण्यात आल्यानंतर येथील बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे.

दुसऱ्या टप्प्याचं काम

एन विभागाच्या सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवारी झालेली कारवाई ही लक्ष्मीबाग नाल्यावरील दुसऱ्या टप्प्यातील असल्याचं सांगितलं. या नाल्याच्या रुंदीकरणाचं पहिल्या टप्प्यातील कारवाई पूर्ण केल्यानंतर रुंदीकरणाचं काम आता पूर्णत्वास येत आहे. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील काम हाती घेतले असून त्यातील ४५ बांधकामांवर मंगळवारी कारवाई केली आहे.

तर उर्वरीत बांधकामांवर कारवाई करून या नाल्यांच्या रुंदीकरणाच्या कामाला गती दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. या नाला रुंदीकरणाचा तिसरा टप्पाही लवकरच हाती घेतला जाणार आहे. ठाणे खाडीच्या दिशेने असलेल्या भागाचे रुंदीकरण या तिसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. याठिकाणी सध्या सुमारे ६५० झोपड्या अस्तित्वात असून त्यासर्वांची पात्रता निश्चित करून पुढील कार्यवाही केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा-

दादर येथील किर्तीकर मार्केटवर महापालिकेचा हातोडा


पुढील बातमी
इतर बातम्या