पावसात अडकल्यास मुंबई पालिकेचं 'हे' अ‍ॅप ठरणार संकटमोचक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसाळ्यात जर कुठं तुम्ही अडकून पडला तर काळजी करू नका आणि घाबरूही नका. कारण आता मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिका प्रशासनाने एक नवीन अ‍ॅप तयार केलं आहे. या अ‍ॅपवर क्लिक करताच अडकलेल्या व्यक्तीचे लोकेशन हे पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षासह मित्र आणि नातेवाईकांना तात्काळ कळणार आहे.

 पावसाळ्यातील आणीबाणीच्या परिस्थितीत आवश्यक गोष्टींची माहिती देणारे ‘डिझास्टर मॅनेजमेन्ट एमसीजीएम’ नावाचे अ‍ॅप मुंबई महापालिकेनं तयार केलं आहे. अँड्रॉईड आणि आयओएस प्रणालीवर चालणारे हे ‘डिझास्टर मॅनेजमेन्ट एमसीजीएम’ अ‍ॅप आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांसाठी संकटमोचकाची जबाबदारी पार पाडू शकेल, असा विश्वास पालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत.

मुंबईकरांना आपल्या मोबाइलवर प्ले स्टोअरमधून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करता येईल. या अ‍ॅपवर पालिका क्षेत्रातील पावसाळी परिस्थितीची माहिती, भौगोलिक स्थितीची माहिती, आणिबाणीप्रसंगी कुठे संपर्क साधावा याची माहिती असेल. हवामान खात्याचे अंदाज, पावसाची स्थिती, भरती-ओहोटीच्या वेळा, पाणी साचल्यामुळे वळविण्यात आलेली वाहतूक, रेल्वे वाहतूक, हवाई वाहतूक याची माहिती मिळणार आहे.

मोबाईल अ‍ॅपवरील एसओएस या वैशिष्टय़पूर्ण सुविधेवर आपले जवळचे नातेवाईक, मित्र यांचे मोबाईल क्रमांक तुम्ही सेव्ह करू शकणार आहात.  पावसाळ्यात कुठल्याही संकटात अडकल्यास `एसओएस’ सुविधेवर क्लिक केल्यास तुम्ही सेव्ह केलेल्या सर्व मोबाईल क्रमांकांवर लोकेशनसह एसएमएस जाणार आहे.  

आणीबाणीच्या काळात आपण नेमके कुठे आहोत ते नातेवाईक वा मित्रांना लघुसंदेशाच्या माध्यमातून कळू शकेल. तसेच अ‍ॅपवरील सुविधेमुळे एक कळ दाबताच ५०० मीटर त्रिज्येच्या परिसरातील रुग्णालये, अग्निशमन दलाचे केंद्र, पोलीस ठाणे, पालिकेच्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष आदींचे संपर्क क्रमांक उपलब्ध होऊ शकतील. मात्र त्यासाठी मोबाइलवरील जीपीएस सुविधा कार्यान्वित असणे गरजेचे आहे.


हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा


पुढील बातमी
इतर बातम्या