मुंबई तुंबलीच नाही, महापौरांचा हास्यास्पद दावा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतलं जनजीवन विस्कळीत झालं. नोकरी-धंद्यासाठी घराबाहेर निघालेल्या मुंबईकरांचे दिवसभर अक्षरश: हाल झाले. जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे तिन्ही मार्गांवरील लोकल ट्रेन, रस्त्यावरील वाहतूक जागीच ठप्प झाली. त्यात हजारो प्रवासी अडकले. असं असूनही मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना मात्र मुंबईत कुठेही पाणी तुंबल्याचं दिसलं नाही. मुंबईत सर्वकाही सुरळीत असल्याचा त्यांनी केलेला दावा हास्यास्पदच म्हणावा लागेल.  

मुंबईकरांची बिकट वाट

मुंबईसह राज्याभरात शनिवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत हिंदमाता, सायन, परळ, दादर अशा नेहमीच्या ठिकाणांसोबत तब्बल १३७ पाणी साचलं होतं. या पाण्यातून कशीबशी वाट काढत मुंबईकरांनी आॅफिस गाठलं. मुंबई महापालिकेने नालेसफाई करूनही यावेळी मुंबईत पाणी का तुंबलं असा प्रश्न प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी महापौर महाडेश्वर यांना विचारला तेव्हा त्यांनी मुंबईत कुठेच पाणी तुंबलं नाही असा दावा केला.

जनजीवन सुरळीत

ते पुढे म्हणाले की, ‘मुंबईत सगळं काही आलबेल आहे. कुठेही पाणी तुंबलेलं नाही किवा वाहतूककोंडी झालेली नाही. मुंबईचं जनजीवन अजिबात विस्कळीत झालेलं नाही. तुम्ही उगाच प्रश्न निर्माण करत आहात.’ असं म्हणत उलट प्रसार माध्यमांनांच धारेवर धरलं. 

महापौर म्हणून मी पाऊस सुरू असताना वेगवेगळ्या भागांत फिरलो.पण मला कुठंही पाणी तुंबलेलं दिसलं नाही. कचरा किंवा प्लास्टिक अडकल्याने काही ठिकाणी पाणी साठत आहे. परंतु पावसादरम्यान जिथं पाणी साचलं होतं तिथं पंपाद्वारे पाण्याचा निचरा करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. 


हेही वाचा-

मुंबईत अतिवृष्टी! फक्त ३ दिवसांत पडला जून महिन्याएवढा पाऊस

ऐन पावसाळ्यात पोलिस कुटुंबिय बेघर, पीडब्ल्यूडीने पाठवली घर खाली करण्याची नोटीस


पुढील बातमी
इतर बातम्या