जून महिना अखेरपर्यंत दडून बसलेल्या पावसाने अचानक उसळी खात मुंबईकरांना अक्षरश: धुवून टाकलं आहे. गेल्या ३ दिवसांपासून मुंबईत धुवाँधार पाऊस पडत आहे. २८ जून ते १ जुलै या ३ दिवसांत मुंबईत तब्बल ४०० मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस संपूर्ण जून महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या सरासरी एवढा आहे.
यंदाचा जून महिना तसा कोरडाच गेला. अरबी समुद्रात अवतरलेल्या वायू चक्रीवादळामुळे मुंबईत येऊ घातलेला मान्सून रोखला गेला. ७ जूनला मुंबईत दाखल होणाऱ्या पावसाला १५ ते २० दिवस विलंब झाला. परिणामी मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीतील रहिवाशांना उकाड्यात दिवस ढकलावे लागले. परंतु वायूचं संकट टळल्यानंतर हळूहळू मान्सून सक्रीय होऊ लागला. त्यानुसार शुक्रवारपासून पुन्हा एकदा पावसाला सुरूवात झाली.
हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार जून महिन्यांत सरासरी ४९३ मि.मि. एवढा पाऊस पडतो. परंतु शुक्रवार ते रविवार रात्रीपर्यंत मुंबईत सरासरी ४०० मि.मि. एवढा पाऊस पडला असून जूनमध्ये एकूण ५१६.३ मि.मि. पाऊस पडल्याची आकडेवारी स्कायमेटने दिली आहे. जूनमध्ये होणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस ९७ टक्के इतका आहे.
सांताक्रूझमध्ये शनिवारी २३४ मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली. मागील १० वर्षांत दुसऱ्यांदा सांताक्रूझमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. तसंच ठाण्यात २३७, तर नवी मुंबईत २४५ मि.मि. इतका पाऊस पडला. २४ तासांमध्ये २०४ मि.मि.पेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं. याआधी मुंबईत २०१५ साली २८३ मि.मि. पाऊस पडला होता.
सध्या पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रीय असल्याने पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हेही वाचा-
पावसाच्या लाइव्ह अपडेट्ससाठी इथं क्लिक करा