वर्सोव्यातील १७ जणांविरोधात महापालिकेने नोंदवला एफआयआर

  • मुंबई लाइव्ह टीम & सचिन धानजी
  • सिविक

वर्सोवा कोळीवाड्यात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहत असून त्याविरोधात महापालिका वारंवार कारवाई देखील करत आहे. तरीही अनधिकृत बांधकामे पुन्हा उभारली जात असल्याने अशा लोकांची यादीच तयार करून महापालिकेने त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे. अशा एकूण १७ जणांविरोधात महापालिकेने एफआयआर दाखल केला आहे. महापालिकेच्या इतिहासातील अशी पहिली घटना मानली जात आहे.

हातोडा चालवण्याची मोहीम

मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेच्यावतीने धडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या आदेशानुसार सर्व विभागांमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला जात आहे. मात्र, वर्सोवा कोळीवाड्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करूनही पुन्हा पुन्हा तिथे बांधकाम उभारली जात आहेत. त्यामुळे खुद्द महापालिकेचे अधिकारीही कारवाई करून हतबल झाले आहेत. महापालिकेच्या कारवाईच्या तुलनेत तोडलेले बांधकाम पुन्हा तेवढ्या जलदगतीने उभारले जात असल्याने अखेर अशाप्रकारे वारंवार कारवाई केल्यानंतरही पुन्हा तिथे बांधकाम करणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक मोहीम हाती घेतली आहे.

इंगा दाखवण्यासाठी

वर्सोवा कोळीवाड्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करूनही पुन्हा ती बांधकामे उभी राहत असल्याने, त्यांना कायद्याचा इंगा दाखवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिका के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी हा धडक निर्णय घेत वर्सोवा कोळीवाड्यातील तब्बल १७ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार हा एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.

'अशी' केली कारवाई

के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी वर्सोवा कोळीवाड्यातील १७ जणांविरोधात एमआरटीपीतंर्गत एफआयआर दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. महापालिकेच्या कारवाईनंतरही ही माणसे पुन्हा ती बांधकामे उभारत असल्याने त्या सर्वांची यादी तयार करून त्यांच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

तडीपारीचे आदेश

याबाबत पोलिसांकडूनही सहकार्य लाभ असून यापुढे जर या सर्वांकडून पुन्हा अनधिकृत बांधकामे उभारली गेल्यास त्यांच्या तडीपारीचे आदेशही पोलिसांमार्फत काढायला लावले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किरण काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या दुजोरा देत याबाबत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगितलं. याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं.

या १७ जणांविरोधात आहे एफआयआर

पीर मोहम्मद हाफीझ शेख, दत्ता सुकूर, कांचन बारिया, रविंद्र पाटील, शरद कोळी, भूषण पाटील, यशवंत बुगा, जयंत मुरा, रामहर्ष यादव, अस्लम सिद्दीकी, अक्षय शिपे, नंदु कलथे, दत्तू नारायण सुकूर,शेखर पांडुरंग भानजी


हेही वाचा-

'ही' उपनगरं होणार कचरापेटीमुक्त

माहिती अधिकारातून ब्लॅकमेलिंग 'अशी' थांबेल!


पुढील बातमी
इतर बातम्या