यांत्रिक झाडूने रस्तेसफाई, निविदा प्रक्रियेत घोळ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

लाखो मुंबईकर दररोज वापरत असलेल्या इस्टर्न फ्री वे आणि एससीएलआर अर्थात सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याच्या सफाईपोटी महापालिका तब्बल चार कोटी रुपये खर्च करणार आहे. तसं कंत्राट केआरएम हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस अँड बिल्डकोन कंपनीला देण्यात आलं आहे. आठवड्याचे दोन दिवस आठवड्यातून दोन दिवस यांत्रिक झाडूने आणि इतर दिवशी हाताने करण्यात येणाऱ्या या सफाईसाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मात्र हे  कंत्राट चुकीच्या पद्धतीने देऊन एकप्रकारे सफाईच्या नावावर तिजोरीची लूट करायला कंत्राटदाराला मोकळी वाट करून दिली जात असल्याचं चित्र दिसून येत आहे.

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्री वे) व सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता(एससीएलआर) हे दोन्ही मार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या मार्फत बनवण्यात आले आहेत. हे दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले झाले असले, तरी अद्यापही हे मार्ग महापालिकेच्या ताब्यात आलेले नाहीत. मात्र, हे दोन्ही रस्ते विकास नियोजन आराखड्यात येत असल्यामुळे या रस्त्यांची साफसफाई महापालिकेकडूनच केली जात आहे.


हेही वाचा

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता

महापालिकेच्या रस्तेकंत्राटात पारदर्शकतेची ऐशीतैशी?


या पूर्वी देण्यात आलेले कंत्राट १७ मे २०१७ रोजी संपुष्टात आल्यामुळे पुढील पाच वर्षांसाठी सफाईसाठी नवीन कंत्राटदार नेमण्यात आले आहेत. महापालिकेने यासाठी मागवलेल्या निविदांमध्ये २ कंपन्यांनी निविदा भरल्या आणि त्यातील एका पात्र कंपनीची निवड करण्यात आली. केआरएम हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस अँड बिल्डकोन या कंपनीला साफसफाईचं सुमारे ४ कोटी रुपायांचं कंत्राट देण्यात आलं. दैनंदिन सफाई व आठवड्यातून दोनदा यांत्रिक झाडूने सफाई, तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या भेटीदरम्यान वाढीव 25 टक्के दिवस यांत्रिकी झाडूने सफाई अशा कामांसाठी 5 वर्षासाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

कशी असते निविदा प्रक्रिया?

महापालिकेच्या नियमानुसार निविदा मागवल्यानंतर जर एक किंवा दोनच निविदा आल्या, तर पुन्हा निविदा मागवणे आवश्यक आहे. कारण स्पर्धात्मक निविदा होण्यासाठी किमान 3 निविदा येण्याची अट आहे. परंतु, जर तिसऱ्यांदाही फेरनिविदा मागवून एक किंवा दोनच निविदा आल्या, तर आयुक्तांच्या परवानगीने पात्र  कंपनीला कंत्राट दिलं जाऊ शकतं.

या प्रकरणात काय झालं?

पूर्व मुक्त मार्ग (इस्टर्न फ्री वे) व सांताक्रुझ चेंबूर जोड रस्ता(एससीएलआर) या मार्गांच्या सफाई कंत्राट प्रक्रियेमध्ये पहिल्या प्रयत्नात दोनच निविदा येऊनही पुन्हा निविदा मागवण्याऐवजी त्यातल्याच एका कंपनीची निवड करण्यात आली.

हे काम अत्यावश्यक असून सातत सुरु रहाणार असल्यामुळे, तसेच 18 मे 2017पूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने दोन निविदाकारांचा विचार करून पात्र कंपनीची निवड केली.

- सिराज अन्सारी, प्रमुख अभियंता, घनकचरा विभाग

पुढील बातमी
इतर बातम्या