Advertisement

मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता


मुंबईकरांना यंदा पावसाळ्यात खड्डेमुक्त रस्ते - आयुक्त अजोय मेहता
SHARES

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांपासून बऱ्याच प्रमाणात मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वारंवार खड्डे पडणाऱ्या खराब रस्त्यांची कामे प्राथमिक स्तरावर पूर्ण करतानाच अन्य रस्त्यांचीही कामे पूर्ण केल्यामुळे यंदा खड्डयांची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी खास 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना केला.

पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडूच नयेत, यासाठी प्रशासनाने बरीच मेहनत घेतली आहे. मुंबईत दरवर्षी काही ठराविक रस्त्यांवरच खड्डे पडत असत. त्यामुळे नेहमी खड्डे पडणाऱ्या जागा संबंधीत सहाय्यक आयुक्तांच्या मदतीने निश्चित करून त्याची यादी तयार करण्यात आली होती. त्यानुसार, 455 ठिकाणी महापालिकेच्या रस्ते खात्याद्वारे खड्डे भरण्याची कार्यवाही केली आहे, असे आयुक्त मेहता यांनी सांगितले.

ज्या वर्दळीच्या रस्त्यांवर अधिक खड्डे आहेत, त्या रस्त्यांवर केवळ खड्डे भरण्याचे (पॅचवर्क) न करता त्या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा भागच पूर्णपणे नव्याने करण्याचे आदेश दिले होते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आता ही सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून जवळपास 455 ठिकाणांपैकी 235 ठिकाणी असलेले ‘पेव्हर ब्लॉक’ बदलून त्या भागाचे डांबरीकरण करण्यात आले, असेही मेहता यांनी स्पष्ट केले.

पावसाळ्यापूर्वी पहिल्या टप्प्यात 94 आणि दुसऱ्या टप्प्यात 938 रस्त्यांची कामं घेण्यात आल्यानं बहुतांशी रस्त्यांची कामे पूर्ण झाली. विशेषत: यापूर्वी केलेले रस्तेही सरसकट खोदून त्या कामाला विलंब करण्याऐवजी तो रस्ता खरवडून त्यांचा पृष्ठभाग चांगल्या स्थितीत करण्याचे धोरण अवलंबल्यामुळे डांबरीकरण जवळपास पूर्ण झाले आहे. पोलिसांचे सहकार्य आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मेहनत यामुळेच यंदा मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते देऊ, असा दावा त्यांनी पुन्हा केला आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा