
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने डोंबिवली ते ठाणे या मार्गावर विशेष बस सेवा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ही नवीन बस सेवा येत्या 4 मार्च 2026 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार बस सेवा
डोंबिवलीतील मोठागाव सर्कल ते ठाणे येथील माजिवडा जंक्शन या दरम्यान ही बस धावणार आहे.
डोंबिवलीतून ठाण्याला जाणाऱ्या सर्वांसाठी हा एक उत्तम पर्यायी मार्ग ठरणार आहे. विशेषतः सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी लोकलमध्ये होणारी जीवघेणी गर्दी टाळण्यासाठी या बस सेवेचा मोठा फायदा होणार आहे.
रस्ते मार्गाने थेट ठाण्यापर्यंत प्रवास करता येणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून केडीएमसी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती.
रस्ते मार्गाचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास रेल्वेवरील ताण कमी होईल, हा मुद्दा त्यांनी आग्रहाने मांडला होता. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत प्रशासनाने तातडीने ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे डोंबिवलीतील हजारो प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दिपेश म्हात्रे यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
तसेच याकामी विशेष सहकार्य आणि पाठिंबा दिल्याबद्दल डोंबिवलीचे आमदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत. ही बस सेवा केवळ प्रायोगिक तत्त्वावर मर्यादित न राहता, भविष्यात ती नियमित करण्यासाठी आणि बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा
