राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या मलबार हिल इथं प्रत्येकी २२ टन वजनाच्या २ ब्रिटीशकालीन तोफा सापडल्या आहेत. या दोन्ही तोफा शनिवारी क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्या.
राजभवनाच्या प्रवेशद्वारानजीकच्या हिरवळीत या तोफा अनेक वर्षांपासून दुर्लक्षित अवस्थेत मातीखाली दबून होत्या. काही महिन्यांपूर्वी वृक्षारोपण सुरु असताना कर्मचाऱ्यांना मातीमध्ये दबलेल्या २ वजनदार तोफा आढळल्या. या तोफा मातीत अनेक वर्षे पडून राहिल्याने झाकल्या होत्या.
त्यानंतर या दोन्ही ब्रिटीशकालीन तोफांवरील माती बाजूला करण्यात आली आणि क्रेनच्या मदतीने ५० मीटर उंच वर उचलून त्यांना राजभवनाच्या हिरवळीवर ठेवण्यात आलं. या तोफांचे वजन प्रत्येकी २२ टन असून, लांबी ४.७ मीटर तर अधिकतम व्यास १.१५ मीटर इतका आहे. या जुळ्या तोफा राजभवनातील जल विहार (बँक्वे हॉल) हॉलच्या समोर ठेवण्यात येणार असून पर्यटकांना व इतिहासप्रेमींना या तोफा पाहता येणार आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव यांनी शनिवारी क्रेनच्या मदतीने तोफा उचलण्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचं परिक्षण करण्याची सूचना केली आहे. या तोफांचं ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन राज्यपालांनी नौदलाच्या तज्ञांची मदत घेऊन तोफांची तांत्रिक माहिती घेण्याच तसंच तोफांचे जुने अभिलेख असल्यास तपासण्याची सूचना राजभवनच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
तसंच २०१६ साली राज्यपालांच्या निवासस्थानाखाली सापडलेल्या भूमिगत बंकरच्या परिक्षणाचं काम एका तज्ज्ञ वास्तूविशारद फर्मच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून हे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी संग्रहालय निर्माण करून बंकर जनतेसाठी खुलं करण्यात येणार आहे.
हेही वाचा-
सचिन तेंडुलकर राज्यपालांच्या भेटीला
विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा तात्काळ भरा - रवींद्र वायकर