मध्य रेल्वेच्या चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये E. coli बॅक्टेरिया आढळला आहे.
मध्य रेल्वेच्या CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा या चार स्थानकांवरील प्रवाशांसाठीच्या वॉटर कूलर्समधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये E. coli बॅक्टेरिया आढळल्याचं CAGच्या ऑडिटमधून समोर आलं आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे
पाण्याच्या नमुन्यांमध्ये E. coli आढळून आल्यानंतर मध्य रेल्वेने तातडीने सुधारात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. रेल्वेच्या इलेक्ट्रिकल आणि मेडिकल विभागांकडून या प्रकरणाचा तपास आणि पुढील कार्यवाही केली जात आहे. संबंधित विभाग पाण्याच्या गुणवत्तेतील त्रुटींचा आढावा घेत असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
पाण्याच्या नमुन्यांमध्ये E. coli आढळलेली चार स्थानके:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT)
कल्याण
भिवंडी रोड
लोणावळा
ही सर्व स्थानके प्रवाशांच्या मोठ्या वर्दळीची असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा अधिक गंभीर बनला आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या कॅगच्या (CAG) ऑडिटमध्ये रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेच्या देखरेखीत त्रुटी असल्याचे समोर आले होते.
कॅगच्या अहवालानुसार, मध्य रेल्वेच्या 28 स्थानकांवर आवश्यक वॉटर टेस्टिंग किट उपलब्ध नव्हते. देशभरातील 15 रेल्वे झोनमधील तब्बल 436 स्थानकांवर अशी टेस्टिंग किट उपलब्ध नसल्याचे ऑडिटमध्ये आढळले होते.
रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, स्थानकांवरील पाणीपुरवठा व्यवस्थेची वर्षातून किमान दोन वेळा तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी मल्टी-पॅरामीटर फील्ड टेस्टिंग किटचा वापर करण्याच्या सूचना आहेत.
CAGच्या निरीक्षणानंतर रेल्वे प्रशासनाने पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.
CAGच्या अहवालानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसोबत दिवसभर आढावा बैठक घेतली होती.
यानंतर रेल्वेने देशभरातील सुमारे 20 हजार ठिकाणी ‘Tank to Tap’ फिल्ट्रेशन आणि मॉनिटरिंग सिस्टम बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच जुन्या पाण्याच्या टाक्या बदलणे, पाण्याची नियमित तपासणी, टाक्यांची स्वच्छता आणि देखभाल अधिक मजबूत करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
आता CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा स्थानकांवरील पाण्याच्या नमुन्यांमध्ये E. coli आढळल्यानंतर मध्य रेल्वेने सुरू केलेल्या उपाययोजनांकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. प्रवाशांना पुरवण्यात येणारे पाणी सुरक्षित आणि आरोग्यासाठी योग्य राहावे, यासाठी या स्थानकांवरील पाणीपुरवठा व्यवस्थेची काटेकोर तपासणी करण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेही वाचा