
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर पान-गुटख्याच्या पिचकाऱ्यांमुळे होणारे डाग आणि अस्वच्छतेला आळा घालण्यासाठी आता नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात माटुंगा रोड स्थानकावर पायलट प्रोजेक्टद्वारे करण्यात आली. या प्रयोगासाठी सुमारे 5 लाख रुपये खर्च आला. या तंत्रज्ञानाचे चांगले परिणाम दिसून आल्यानंतर पश्चिम रेल्वेने इतर गर्दीच्या स्थानकांवरही त्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे.
आतापर्यंत दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर हे नॅनो कोटिंग करण्यात आले आहे. पुढील टप्प्यात खार स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. खार स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात, तसेच अनेक व्हीआयपींच्या भेटी होत असल्याने या स्थानकाची विशेष निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या उपचारासाठी जर्मन नॅनो-टेक्नॉलॉजीवर आधारित विशेष उत्पादनांचा वापर केला जात आहे. ‘Wallguard’ आणि ‘Metalguard’ या उत्पादनांच्या माध्यमातून भिंती, छत, लिफ्ट तसेच विविध धातूंच्या पृष्ठभागांवर कोटिंग केले जाते.
या कोटिंगमुळे पान आणि गुटख्याचे डाग पृष्ठभागाच्या आत खोलवर जाण्यापासून रोखले जातात. त्यामुळे डाग सहजपणे साफ करता येतात. याशिवाय हे कोटिंग ग्राफिटी, गंज, बदलते हवामान आणि नियमित झीज यापासूनही पृष्ठभागाचे संरक्षण करण्यास मदत करते.
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सध्या पान-गुटख्याचे हट्टी डाग साफ करण्यासाठी सुमारे 30 मिनिटांचा वेळ लागू शकतो. मात्र नॅनो कोटिंग केलेल्या पृष्ठभागावर डाग खोलवर मुरत नसल्याने तोच डाग सुमारे 5 मिनिटांत साफ करता येण्याची शक्यता आहे.
या कोटिंगचा प्रभाव जवळपास पाच वर्षांपर्यंत टिकण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वारंवार डाग साफ करणे, रंगकाम करणे आणि पृष्ठभागाची दुरुस्ती करण्यासाठी होणारा खर्चही कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने पान-गुटखा खाऊन थुंकणाऱ्या आणि स्थानकांवर अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाईही तीव्र केली आहे.
1 एप्रिल ते 31 जुलै 2026 या चार महिन्यांच्या कालावधीत चर्चगेट-विरार मार्गावरील 34 उपनगरीय स्थानकांवर थुंकणे आणि अस्वच्छता निर्माण करण्याची 12,265 प्रकरणे नोंदवण्यात आली. या कारवाईत रेल्वेने तब्बल 27.18 लाख रुपयांचा दंड वसूल केला.
या यादीत विरार स्थानक आघाडीवर असून येथे 1,242 प्रकरणांमध्ये 4.31 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यानंतर बोरिवलीत 1,016 प्रकरणे आणि 2.09 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला.
तर दादरमध्ये 806, अंधेरीत 756आणि चर्चगेटमध्ये 485 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.
पश्चिम रेल्वेच्या मते, स्थानकांची स्वच्छता राखण्यासाठी केवळ तंत्रज्ञानावर अवलंबून राहता येणार नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई, प्रवाशांमध्ये जनजागृती आणि नियमित साफसफाई यासोबतच नॅनो कोटिंगचा वापर सुरू ठेवण्यात येणार आहे.
विशेषतः मुंबईतील गर्दीच्या स्थानकांवर दररोज लाखो प्रवाशांची ये-जा होत असल्याने भिंती, जिने, खांब आणि इतर सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवणे हे रेल्वेसमोर मोठे आव्हान आहे. अशा ठिकाणी नॅनो कोटिंग, दंडात्मक कारवाई, जनजागृती या त्रिसूत्रीच्या माध्यमातून स्थानकांना अधिक स्वच्छ ठेवण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे.
हेही वाचा
