JNPA-मुंबई जलवाहतुकीच्या मार्गात बदल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पावसाळ्यात खवळणारा समुद्र, वादळी वारे आणि उसळणाऱ्या महाकाय लाटांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या (जेएनपीए) जलवाहतूक विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

जेएनपीए बंदर ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) दरम्यान चालणारी नियमित प्रवासी बोट सेवा पावसाळ्याच्या कालावधीत ‘भाऊचा धक्का’ (फेरी व्हार्फ) येथून चालविण्यात येणार असल्याची माहिती जेएनपीए जलवाहतूक विभागाचे कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.

ही तात्पुरती व्यवस्था 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत लागू राहणार असून पावसाळा संपल्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.

गेल्या 37 वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेली जेएनपीए ते मुंबई (mumbai) जलवाहतूक सेवा प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

मात्र पावसाळ्यात (rainy season) समुद्रात 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळत असल्याने गेट वे ऑफ इंडिया येथे बोटी लावणे धोकादायक ठरते.

प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग (alibaug) आणि गेट वे ऑफ इंडिया ते घारापुरी (एलिफंटा) या मार्गावरील जलवाहतूक सेवा दरवर्षी पावसाळ्यात बंद ठेवण्यात येते.

उरणमधील (uran) मोरा ते मुंबई ही जलवाहतूक सेवा वर्षभर सुरू असते. त्याच धर्तीवर जेएनपीए ते मुंबई जलवाहतूक सेवा बंद न करता केवळ तिच्या मार्गात सुरक्षिततेच्या दृष्टीने बदल करण्यात आला आहे.

रस्त्याने प्रवास करण्यासाठी मोठा वेळ आणि इंधन खर्च करावा लागत असताना या जलमार्गाद्वारे केवळ एका तासात विनाअडथळा आणि तुलनेने प्रदूषणमुक्त प्रवास शक्य होत आहे.

या सेवेचा सर्वाधिक लाभ जेएनपीए बंदरातील अधिकारी, कर्मचारी, कामगार, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी जेएनपीए कामगार वसाहतीतून थेट जेएनपीए लँडिंग जेटीपर्यंत दर तासाला विशेष बस सेवा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

जेएनपीए प्रशासनातर्फे ही सेवा अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात येत असल्याने बंदराशी संबंधित उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी ही जलवाहतूक सेवा जीवनवाहिनी ठरत आहे.


हेही वाचा

शाळेच्या बस शुल्कात 15 टक्क्याने वाढ

ठाणे : चेंदणी-कोळीवाडा रहिवाशांचा ठाणे मेट्रो मार्गाला विरोध

पुढील बातमी
इतर बातम्या