
राज्यात (maharashtra) पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी पाठोपाठ आता शालेय बस शुल्कातही 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय शालेय बस (school bus) मालक संघटनेने (SBO) घेतला आहे.
ही दरवाढ जून 2026 पासून लागू होणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी जाहीर केले आहे. यामुळे वाढत्या महागाईत पालकांच्या खिशाला आणखी कात्री लागली आहे.
पेट्रोल (petrol), डिझेल, गॅस दरवाढी पाठोपाठ आता शालेय बस शुल्कातही 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय शालेय बस मालक संघटनेने (एसबीओए) घेतला आहे.
शालेय बस व्यवसायासमोरील आर्थिक अडचणींबाबत उपाययोजना करण्याबाबत स्कुल बस संघटनेने राज्य शासन आणि राज्य परिवहन विभागाकडे पत्रव्यवहार केला होता.
या माध्यमातून संघटनेने बस शुल्कवाढ टाळण्यासाठी पर्यायी उपाय सुचविले होते.
मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस मदत किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने शुल्कवाढीचा निर्णय घेतल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
शासनाकडून आवश्यक मदत न मिळाल्यास शालेय वाहतूक उद्योगाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सेवा देण्यास शालेय बस चालक-मालक कटिबद्ध असल्याचे सांगत पालक, शाळा आणि सर्व संबंधितांनी सहकार्य व समजूतदारपणा दाखवावा, असे आवाहनही संघटनेने केले आहे.
शालेय बस सेवांच्या संचालनासाठी लागणाऱ्या खर्चात सातत्याने वाढ होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंधन व डिझेल दरवाढ, चालक व कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहन देखभाल, सुटे भाग, विमा, कायदेशीर अनुपालन शुल्क, टोल व परवाना खर्च, ई-चलन व दंडाचा वाढता भार तसेच सर्वसाधारण महागाई यामुळे व्यवसाय टिकवणे कठीण झाले असल्याचे संघटनेने नमूद केले.
वाहतूक क्षेत्रातील वाढत्या खर्चाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असून विमान वाहतूक कंपन्यांनीही भाडेवाढ केल्याचा दाखला संघटनेने दिला आहे.
शालेय बस चालक-मालकांना सुरक्षा नियमांचे पालन करत सेवा सुरू ठेवण्यासाठी वाढीव खर्चाचा सामना करावा लागत असल्याचेही म्हटले आहे.
हेही वाचा
