Advertisement

वारंवार वीज खंडित होण्यावर BESTचा 20 कोटींचा आपत्कालीन आराखडा

गिरगाव, भुलेश्वर, ऑपेरा हाऊससह अनेक भागांतील दीर्घ वीज खंडित प्रकरणांनंतर BESTचा मोठा निर्णय

वारंवार वीज खंडित होण्यावर BESTचा 20 कोटींचा आपत्कालीन आराखडा
SHARES

Brihanmumbai Electric Supply and Transport (BEST) उपक्रमाने गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील वारंवार होणाऱ्या वीज खंडित समस्यांवर उपाय म्हणून 20 कोटी रुपयांच्या आपत्कालीन कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे. मंगळवारी, 2 जून रोजी झालेल्या BEST समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

दक्षिण मुंबईतील दीर्घकाळ सुरू असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला होता. सोमवारी गिरगाव, भुलेश्वर, ऑपेरा हाऊस, ठाकूरद्वार, काळबादेवी आणि आसपासच्या भागांमध्ये जवळपास 12 तास वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे संतप्त नागरिकांनी पाठकवाडी येथील BEST केंद्रावर धडक देत प्रशासनाविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली.

वीज खंडित झाल्यानंतर नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती किंवा अपडेट्स देण्यात न आल्याने BEST प्रशासनावर टीका झाली होती. त्यानंतर BEST ने हा विशेष कृती आराखडा सादर केला. या आराखड्यात मनुष्यबळ वाढवणे, अतिरिक्त उपकरणांची तैनाती, फॉल्ट रिस्पॉन्स सिस्टीम अधिक मजबूत करणे आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया जलद करण्यावर भर देण्यात आला आहे.

यासाठी 690 फील्ड कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार असून केबल फॉल्ट शोधणे आणि दुरुस्तीचे काम वेगाने करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच वाहतूक विभागातील 127 चालक आणि 100 मेकॅनिक यांची तात्पुरती नियुक्ती वीज विभागाच्या कामासाठी करण्यात येणार आहे.

याशिवाय 350 डिझेल जनरेटर सेट्स, एरियल लिफ्टिंग उपकरणे आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येणार आहे. मोठ्या बिघाडाच्या वेळी वीजपुरवठा जलद सुरू करण्यासाठी ताडदेव येथे दुसरे फॉल्ट कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे.

अधिकाऱ्यांना मोठ्या केबल फॉल्टची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या परिसरातील बहुतांश भूमिगत वीज केबल्स 1985 ते 1990 दरम्यान टाकण्यात आल्या होत्या. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात वाढलेल्या वीज वापरामुळे या जुन्या केबल्सवर प्रचंड ताण आला आहे.

काही केबल्स रेल्वे रुळांखाली तब्बल 15 फूट खोल असल्यामुळे तपासणी आणि दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाची परवानगी घ्यावी लागत असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, BEST उपक्रमाने आपल्या वीज विभागाची अवस्था गंभीर असल्याची कबुली दिली आहे. गेल्या 12 वर्षांतील काटकसरीची धोरणे, मर्यादित भरती आणि वीज वितरण विभागात पुरेशा गुंतवणुकीचा अभाव यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे BEST ने मान्य केले.



हेही वाचा

मृणाल ताई गोरे फ्लायओव्हर 6 जूनपासून खुला होणार

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा