वसईतील चर्चला युनेस्को आशिया-पॅसिफिक मेरिट पुरस्कार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वसईतील (vasai road) पापडी येथील प्रतिष्ठित अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रलला या ऐतिहासिक चर्चला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी 2025 चा UNESCO Asia-Pacific Awards for Cultural Heritage Conservation मधील ‘मेरिट पुरस्कार’ जाहीर झाला आहे.

बँकॉक येथे पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

युनेस्कोने जाहीर केलेल्या आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सर्वोत्तम दहा संवर्धन प्रकल्पांमध्ये वसईतील 452 वर्षे जुन्या या कॅथेड्रलचा समावेश आहे.

सोळाव्या शतकातील पोर्तुगीज (portuguese) स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी सुमारे 4.75 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता.

या जीर्णोद्धाराचे वैशिष्ट्य म्हणजे सिमेंटचा वापर टाळून पारंपरिक पद्धतीने चुन्याच्या साहाय्याने दुरुस्ती करण्यात आली.

मुंबईतील ‘सवानी हेरिटेज कॉन्सर्व्हेशन’ या वास्तुविशारद संस्थेने, वसईतील गिरिज येथील ‘सिक्वेरा फाइन आर्ट’ तसेच स्थानिक कुशल कारागिरांच्या सहकार्याने 2023-24 या कालावधीत चर्चचे काम पूर्ण केले.

गाभाऱ्याचा भाग आकर्षक लाकडी कोरीवकामाने सजविण्यात आला आहे.

युनेस्कोने आपल्या प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे की, महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्मप्रसाराचा हा जिवंत पुरावा आहे. पारंपरिक कारागिरीच्या वापरातून केलेले संवर्धन उल्लेखनीय आहे.

सूक्ष्म आणि जाणीवपूर्वक केलेल्या हस्तकलेमुळे हे प्रार्थनास्थळ पुन्हा जुन्या वैभवात नटले आहे. 2000 पासून दरवर्षी युनेस्कोकडून आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या वास्तू, वसाहती आणि प्रकल्पांना गौरविण्यात येते.


हेही वाचा

फेब्रुवारीत सलग दुसऱ्या दिवशी उच्चांक तापमानाची नोंद

नवीन साकेत उड्डाणपूल खुला

पुढील बातमी
इतर बातम्या