कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरची हद्द पूर्ण सील, बाहेर पडलेल्यांना पुन्हा नो एण्ट्री

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर शहराची हद्द पूर्णपणे सील करण्याचा निर्णय संबंधित महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. येत्या ८ मेपासून हा निर्णय महापालिका क्षेत्रात लागू होणार आहे. त्यानंतर या शहरांची हद्द ओलांडून बाहेर जाणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा शहरात घेतलं जाणार नाही. त्यांच्यासाठीही शहराची सीमा पूर्णपणे बंदच राहील.

२२४ कोरोनाबाधित रुग्ण

कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ५ मे २०२० पर्यंत २२४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १४७ कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ६० रुग्ण हे केडीएमसी क्षेत्रातून मुंबईतील विविध भागात जाणारे आहेत. मुंबईतून शहरात कोरोनाचा प्रसार होत असल्याचं लक्षात घेऊनच कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी यांनी हा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रातून पाठवलेल्या परप्रांतीयांची कोंडी, उत्तर प्रदेश सरकार म्हणतं…

 

पुन्हा हद्दीत प्रवेश नाहीच

सध्याच्या घडीला केडीएमसी हद्दीतून दररोज अडीच हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी मुंबईतील विविध भागात जातात. या कर्मचाऱ्यांसाठी महापालिकेने एक फाॅर्म जारी केला आहे. या फाॅर्ममध्ये कर्मचाऱ्यांना त्यांची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. तसंच केडीएमसी हद्दीबाहेर गेल्यानंतर त्यांना पुन्हा हद्दीत प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील सरकारी, महापालिका आणि खासगी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेच्या माध्यमातून त्यांच्या कामाच्या नजीकच्या हाॅटेलांमध्ये करण्यात येणार आहे.

अशाच पद्धतीचा निर्णय हा उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनीही घेतला आहे. यामुळे येत्या ८ मे पासून केडीएमसी आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्राची हद्द ओलांडून कुणालाही आत किंवा बाहेर जाता येणार नाही.

हेही वाचा - चाकरमान्यांसाठी एकदाच काय ते धोरण ठरवा- नितेश राणे
पुढील बातमी
इतर बातम्या