ठाण्यातल्या 'या' विभागातील दुकानं मंगळवारपासून पूर्णत: बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दिवसेंदिवस कोरोनाचे (Coronavirus Update) नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे आता अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown in Mumbai) कठोर करण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत. ठाण्यातही (Thane) कोरोनाची अनेक नवी प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. त्यामुळे ठाण्यात रेड झोन (Red Zone) असलेल्या शहरांमध्ये सोमवारी मध्यरात्रीपासून सर्व दुकानं अनिश्चीत कालावधीसाठी बंद करण्यात येणार आहेत.

सावरकरनगर प्रभागसमिती क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ६, १३, १४ आणि १५ म्हणजेच लोकमान्यनगर, सावरकनगर, इंदिरानगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी विभागामध्ये कोरोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू असूनदेखील नागरिक दुकानं तसंच भाजी मार्केटमध्ये मोठ्याप्रमाणावर गर्दी करीत आहेत.

रस्त्यावरील वर्दळदेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागरिकांमार्फत सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्यामुळे लॉकडाऊन करुनसुध्दा काही सुधारण दिसून आलेली नाही. त्यामुळे ११ तारखेच्या मध्यरात्रीपासून हे सर्व विभाग अनिश्चीत कालावधीसाठी पूर्णत: बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असल्यानं सगळ्या देशाचं लक्ष महाराष्ट्र आणि मुंबईकडे लागलं आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं सगळ्यांची चिंता वाढली आहे. मात्र राज्यात आता इतर शहरांमध्येही कोरोनाचा उद्रेक झाल्यानं रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. औरंगाबाद, सोलापूर आणि मालेगाव सारख्या शहरांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.

मुंबईत सोमवारी तब्बल ७९१ रुग्णांची वाढ झाली. तर ५८७ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला. आजच्या ३६ पैकी २० मृत्यू मुंबईतले आहेत. पुणे विभागातील १ हजार २३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३ हजार ३६५ झाली आहे. तर अॅक्टीव रुग्ण १ हजार ९५३ आहेत.


हेही वाचा

रेशन दुकानांवर मिळणार मोफत डाळ- छगन भुजबळ

पुढील बातमी
इतर बातम्या