महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन कायम, १ जुलैपासून ‘मिशन बिगीन अगेन’ २.० होणार सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या पार गेलेली असताना राज्यात ३१ जुलैपर्यंत लाॅकडाऊन (Maharashtra Lockdown) कायम ठेवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने सोमवार २९ जून २०२० रोजी घेतला आहे. त्याचसोबत ‘मिशन बिगीन अगेन’ चा दुसरा टप्पा (Mission Begin Again 2.0) १ जुलैपासून सुरू होणार असल्याचंही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. याचाच अर्थ राज्यातील अनलाॅक देखील सुरूच राहणार आहे. 

राज्यात रविवारी कोरोनाच्या ५४९३ नवीन रुग्णांचं निदान झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६४ हजार ६२६ वर जाऊन पोहोचली आहे. तर दिवसभरात १५६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण मृत्यूचा आकडा वाढून ७४२९ वर पोहोचला आहे. सद्यस्थितीत राज्यात ५ लाख ७० हजार  ४७५ लोकं होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३७ हजार ७५० लोकं संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

हेही वाचा - ३० जूननंतर लाॅकडाऊन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

मिशन बिगीन अगेनवर भर 

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मागील ३ महिन्यांपासून लाॅकडाऊन सुरू आहे. देशव्यापी लाॅकडाऊनचा पाचवा टप्पा (Lockdown 5.0) येत्या ३० जून रोजी संपत आहे. हा टप्पा संपण्याआधीच महाराष्ट्र सरकारने पुढच्या टप्प्यातील लाॅकडाऊनची घोषणा केली आहे. त्यातही विशेष म्हणजे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ २.० वर विशेष भर दिला आहे. 

महाराष्ट्रात १ जूनपासून 'मिशन बिगिन अगेन' सुरू करण्यात आलं होतं. त्यात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांत बऱ्याच प्रमाणात निर्बंध शिथील करण्यात आले. खासगी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला काही अटी-शर्थी अंतर्गत मुभा देण्यात आली. खासगी कार्यालये, दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. त्यामुळे ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्यातही अनेक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करण्यात येतील, असं म्हटलं जात आहे. 

भ्रमात राहू नका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना अनेक बाबी स्पष्ट केल्या होत्या. लॉकडाऊन जरी मागे घेण्यात येणार नसला तरी राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि अर्थचक्र गतीमान व्हावं म्हणून आपण अनेक गोष्टीत शिथिलता आणत आहोत. आपण एक एक पावलं टाकत पुढं जाणार आहोत. पण त्याचा अर्थ धोका टळला आहे, या भ्रमात राहू नका. सध्या आपली अवस्था कात्रीत सापडल्यासारखी झाली आहे. हळूहळू सर्व सोयी सुरू करायच्या म्हणजे घराबाहेर बिनधास्तपणे पडायचं असं नाही. कारण बाहेर करोना आ वासून बसलाय. त्यामुळे अनावश्यक गोष्टीसाठी घराबाहेर पडू नका, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.  

हेही वाचा - ठाण्यात १ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन
पुढील बातमी
इतर बातम्या