मैदानाच्या जागेवर करीरोडचा पादचारी पूल, संपादनापूर्वीच रेल्वेकडे ताबा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील करीरोड रेल्वे स्थानकावर लष्कराच्या माध्यमातून पादचारी पुलाचे बांधकाम सुरु आहे. मात्र, या बांधकामासाठी मैदानांची जागा वापरली जात आहे. या जागेचे संपादन सुरु होण्यापूर्वीच रेल्वेने लष्कराच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली आहे. रेल्वेने महापालिकेला सुमारे साडेपाच कोटी रुपये देऊन ही जागा संपादित करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

एका दिवसात झाले जमीन हस्तांतरण!

करी रोड रेल्वे स्थानकातून बाहेर जाण्यासाठी एकच पादचारी पूल आहे. एल्फिन्स्टन पूल चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी पादचारी पूल बांधण्यात येत आहे. या पुलाचे बांधकाम सध्या भारतीय लष्कराच्या मदतीने केले जात आहे. पुलासाठी भूखंडाची जागा संपादन करण्याची गरज लक्षात घेऊन महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने येथील मेसर्स गोदरेज अँड बॉईस मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून ही जागा आधीच ताब्यात घेतली. हा ताबा महापालिकेने घेऊन तो रेल्वे प्रशासनाकडे त्याच दिवशी दिला.

जमीन संपादन मंजुरीआधीच हस्तांतरीत

मात्र आता, संपादनाचा सर्व खर्च हा रेल्वे प्रशासन करणार असून रेल्वे प्रशासनाने २८ नोव्हेंबर २०१७ ला या जमिनीची आगाऊ रक्कम म्हणून ५ कोटी १० लाख रुपयांची रक्कम जमा केली आहे. ही जमीन संपादन करण्याचा हा प्रस्ताव सुधार समितीपुढे मान्यतेसाठी आला आहे.

आरक्षण रस्त्याचं, बांधकाम पुलाचं!

महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यानुसार ही जागा मनोरंजन मैदान व रस्ता यासाठी राखीव आहे. सुमारे २४९ चौरस मीटर क्षेत्रफळाची ही जागा आहे. जमीन मालकाने आरक्षित जमिनीच्या बदल्यात हस्तांतरीत विकास हक्क अर्थात टीडीआर नको असे महापालिकेला कळवल्यामुळे या जागेच्या संपादनासाठी रक्कम देण्यात येत आहे.

इतर पुलांसाठीही तत्परता दाखवा!

पुलासाठी जागा कमीत कमी वेळात उपलब्ध करून दिल्यामुळे काम तातडीने सुरु होणे शक्य झाले. मात्र, महापालिकेच्या उड्डाणपुलांसाठी तसेच पादचारी पुलांसाठी रेल्वेकडे पैसे जमा करूनही या कामांना गती मिळत नाही. करी रोडच्या पुलासाठी जमीन संपादन होण्यापूर्वीच त्याचा ताबा देऊन रेल्वेला काम करायला महापालिकेकडून सहकार्य केले जात आहे. पण महापालिकेच्या इतर पुलांची कामे मात्र रेंगाळलेली आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या