'आजारापेक्षा इलाज भयंकर...' करी रोडचा नवा पूलही अरूंद!


SHARE

जुने-ब्रिटीशकालीन पादचारी पूल प्रवाशांच्या वाढत्या संख्येला सामावून घेण्यात अपयशी ठरत असल्याचं एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीतून सिद्ध झालंय. एल्फिन्स्टनच नाही, तर चिंचपोकळी, करी रोड, विरार, नालासोपारा, परळ, कुर्ला रेल्वे स्थानकातील अनेक पूल अरूंद असल्यानं येथे कुठल्याही क्षणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातही करी रोड रेल्वे पादचारी पुलाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास इथं 'आजारापेक्षा इलाज भयंकर', अशी स्थिती आहे. या मागचं कारण म्हणजे आधीच अरूंद असलेल्या पुलाऐवजी स्थानकात जो नवीन पूल उभारण्यात येतोय, तो देखील अरुंद असल्याचं समोर आलं आहे. 


सध्याचा पादचारी पूल अरूंद

सद्यस्थितीत करी रोड स्थानकाला जोडणारा एकुलता एक पादचारी पूल इतका अरूंद आहे की, गर्दीच्या वेळेस या पुलावरून चालायचं म्हणजे सर्कशीत भाग घेण्यासारखंच. पूल चढून वर गेल्यावर समोर येते तिकीट खिडकी. तिकीट खिडकीसमोरच्या अरूंद जागेत प्रवासी तिकीट काढण्यासाठी रांग लावून उभे असतात, तर त्याच वेळेला त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रवासी स्थानकातून आत-बाहेर करत असतात.  


३० वर्षांपासून पुलाचा प्रस्ताव कागदावरच

या पुलाची रुंदी वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून वर्षांनुवर्षे होत आहे. या मागणीनुसार रेल्वेनं पुलाची रुंदी वाढवण्याचा प्रस्ताव आणला खरा, पण ३० वर्षे झाली तरी हा प्रस्ताव कागदावरच आहे. तर दुसरीकडे प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन रेल्वेनं स्थानकावर नवा पादचारी पूल बांधण्याचं काम हाती घेतलं आहे. मात्र हा पूलही अरूंद असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. 


एकावेळेला दोनच प्रवासी चढू शकतील

एकावेळेला दोन प्रवासी चढू शकतील आणि एक प्रवासी उतरू शकेल एवढीच या पुलाची रुंदी आहे. हा नवा पूल प्लॅटफाॅर्मवर अगदी मधोमध उतरवण्यात आला असून त्याच्या समोर अगदी दोन फुटांवर प्लॅटफाॅर्मवरील शेडचा पिलर आहे. त्यामुळे प्रवाशांना या पुलावर चढण्या-उतरण्यासाठी पुन्हा जीवाची बाजी लावावी लागणार हे निश्चित.


पुलाचा आढावा घ्या

एकमेव प्लॅटफाॅर्म असल्याने गाडीतून चढण्यासाठी-उतरण्यासाठीही प्रवाशांची कसरत होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलामुळे एल्फिन्स्टनसारखी दुर्घटना होण्याची शक्यता दाट असतानाच आता नवा पुलही प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा ठरण्याची भिती आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जागे होत, या पुलाची उभारणी करताना गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.  हेही वाचा -

एल्फिन्स्टन पूल दुर्घटना: 'ते' गहिरे घाव भरून निघण्यास थोडा वेळ लागेल...

एल्फिन्स्टन रेल्वे दुर्घटना: ‘या’ ६ हातांनी वाचवले शेकडो प्रवाशांचे प्राणडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

संबंधित विषय