तरुणीचा मृतदेह समजून दिला तरुणाचा मृतदेह, नवी मुंबईतील धक्कादायक घटना

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईतील वाशीमधील पालिका रुग्णालयात मृतदेहाची अदलाबदल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीचा मृतदेह समजून एका तरुणाचा मृतदेह तिच्या नातेवाईकांना देण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोन्ही कुटुंबाना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.  

दोन दिवसांपूर्वी वाशी येथील पालिका रुग्णालयातून एक मृतदेहच गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. मोहम्मद उमर फारुख शेख असं मृत व्यक्तीचं नाव होतं. शेख याचा ९ मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, कोरोना चाचणीचा अहवाल यायचा असल्याने त्याचा मृतदेह वाशीमधील पालिका रुग्णालयात ठेवण्यात आला होता.

रविवारी कोरोना चाचणीचा अहवाल आला. यामध्ये मृत व्यक्ती कोरोना नेगेटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे शेख याचं कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी मोहम्मद उमर फारुख शेख यांचा मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे मोहम्मद उमर फारुख शेख यांच्या कुटुंबीयांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

मात्र,  महापालिका रुग्णालयाच्या शवागरातून मोहम्मद उमर फारुख शेख याचा मृतदेह एका मृत तरुणीच्या नातेवाईकांना देण्यात आल्याचं चौकशीनंतर उघडकीस आलं. विशेष म्हणजे ज्या नातेवाईकांना उमर शेखचा मृतदेह देण्यात आला, त्या नातेवाईकांनी देखील ताब्यात घेतलेला मृतदेह मुलीचा असल्याची खातरजमा न करता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

तर दुसरीकडे मोहम्मद उमरचा मृतदेह समजून त्याच्या कुटुंबियांना एका मुलीचा मृतदेह देण्यात आला. हे लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यांनी मुलाचा मृतदेह आपल्या ताब्यात द्यावा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गोंधळ उडाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून अन्य कारणांमुळे मृत पावणार्‍या व्यक्तींचीही सध्या कोरोना चाचणी  करण्यात येत आहे. रिपोर्ट येण्यासाठी काही दिवस लागत असल्यामुळे वाशी येथील महापालिका रुग्णालयातील शवागरात मृतदेहांची संख्या वाढली आहे. एका रॅकमध्ये दोन-दोन मृतदेह ठेवण्यात येत आहेत. कोरोनाच्या धास्तीने शवागरात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी पॅकबंद असलेले मृतदेह नातेवाईकांना दिले. यावेळी मृतदेहांची अदलाबदल झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा - 

ठाण्यातील कंटेन्मेंट झोनची लिस्ट, संपूर्ण तपशीलासह...

महाराष्ट्रासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा, देवेंद्र फडणवीसांची ठाकरे सरकारकडे मागणी


पुढील बातमी
इतर बातम्या