सर्वसामान्यांच्या 'दुखण्यात' भर, 2 जानेवारीला डॉक्टर संपावर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये राज्यातली जनता मग्न असतानाच राज्यातल्या डॉक्टरांनी जनतेला झटका दिला आहे. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे 2 जानेवारीपासून मुंबईसह राज्यभरातले डॉक्टर संपावर जाणार आहेत. नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाला विरोध करण्यासाठी डॉक्टरांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २ जानेवारीला रुग्णालयातील फक्त आपात्कालीन सेवा सुरु राहणार आहेत.

काय आहे हे विधेयक?

नॅशनल मेडिकल कमिशन बिल अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयका अंतर्गत वैद्यकीय क्षेत्रावर नियंत्रण आणि वैद्यकीय संस्थांचे मूल्यमापन करण्यासाठी 4 स्वायत्त मंडळं स्थापन करण्यात येतील. डॉक्टरांची नोंदणी, त्यांचे नुतनीकरण ही कामे या आयोगाकडून केली जातील. विशेष म्हणजे या आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य हे शासन नियुक्त असतील. याव्यतिरिक्त निवडणुकीच्या माध्यमातून 5 सदस्यांची निवड केली जाईल, तर 12 सदस्य हे पदसिद्ध असतील.

कसं असेल संपाचं स्वरूप?

येत्या 2 जानेवारीला म्हणजेच मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत डॉक्टर संपावर जाणार आहेत. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

एनएमसी बिलाविरुद्ध आमचा संप नाही. त्यात लागू केलेल्या त्रुटी आणि कायद्यांमुळे सामान्य रुग्णांना त्रास होणार आहे. आम्ही सरकारसोबत चर्चा करत आहोत. पण, सरकारकडून ठोस प्रतिसाद आलेला नाही. याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे.

डॉ. शिवकुमार उत्तुरे, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचा मसुदा गरीब रुग्णांच्या विरोधात आहे. हा मुद्दा लोकशाहीच्याही विरोधात असल्याचं सांगण्यात येत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या