आमची उंची आमचा अपराध आहे का?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपण चित्रपटात किंवा रस्त्यावर जाताना अनेक वेळा उंचीनं कमी असलेली माणसं पाहतो. अनेकवेळा निव्वळ विनोद म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चित्रपटात नेहमी दिसणाऱ्या या बुटक्या माणसांमध्ये कला-गुण असूनही निव्वळ विनोद म्हणून अनेकदा त्यांना रोल दिले जातात. त्यांना गांभीर्यानं स्वीकारलं जात नाही. इतर कुणाच्याही सहज नजरेआड होणारी ही बाब लक्षात आली ती गोरेगावच्या महाराष्ट्र मंडळाच्या.

गोरेगावमध्ये गुरुवारी अशी ४० हून अधिक बुटकी माणसं जमली होती. यांच्या चेहऱ्यावर जरी हसू दिसत असलं, तरी त्यांच्या समस्या भरपूर आहेत. बस, ट्रेनमध्ये चढता येत नाही, गर्दीत चालता येत नाही, नोकरी मिळत नाही. मात्र, त्यांच्या या समस्यांकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते.

आमच्याकडे अनेकदा विनोद म्हणून बघितलं जातं. आमच्या खूप अडचणी आहेत. आम्हाला साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात. आम्हाला मापाचे कपडे मिळत नाहीत, लग्न जमण्यात अडचणी येतात. आमच्याकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे.

मनोहर शिंदे

महाराष्ट्र मंडळाने या बुटक्या व्यक्तींचे संमेलन घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी या सर्व व्यक्तींनी आपल्या समस्या मांडल्या. यावेळी महाराष्ट्र मंडळाने त्या व्यक्तींना त्यांच्या मापाचे कपडे देऊन त्यांचा सन्मान केला.

शिक्षण घेऊनसुद्धा या लोकांना नोकरी मिळत नाही. मिळाली तरी कमी उंचीमुळे प्रवास करता येत नाही. लोक विनोदाचा भाग म्हणून त्यांच्याकडे बघतात. यांना समाजात मान मिळावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवला आहे.

रमाकांत थोरवे, अध्यक्ष, महाराष्ट्र मंडळ


हेही वाचा - 

गोरेगावात महाराष्ट्र जनता दलाचे संमेलन

पुढील बातमी
इतर बातम्या