ईव्हीएम हॅकींग प्रकरण-निवडणुक आयोगाकडून पोलिसांत तक्रार दाखल

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारताचं ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आल्याचा आणि याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना झाल्याने त्यांचा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करणाऱ्या हॅकर सय्यद शुजाविरोधात अखेर केंद्रीय निवडणूक आयोगानं पोलिसांत धाव घेतली आहे. दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करत शुजाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी निवडणूक आयोगानं केली आहे. तर या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही आयोगानं केली आहे.

ईव्हीएम सुरक्षित

सोमवारी लंडनमध्ये एक गुप्त पत्रकार परिषद झाली आणि या परिषदेनं भारतात चांगलीच खळबळ माजवली. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून ईव्हीएम मशीन हॅक करण्यात आलं होतं. तर दिल्लीच्या २०१५ च्या विधानसभा निवडणूकीतही भाजपाला ईव्हीएम मशीन हॅक करायचं होत, पण त्यांना तसं करता आलं नाही आणि भाजपाचा पराभव झाला असा दावाही हॅकर शुजानं केला आहे. या पत्रकार परिषदेनंतर त्वरीत निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीन पूर्णत: सुरक्षित असल्याचं म्हणत शुजाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तर जाणिवपूर्वक भारताला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हणत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार असल्याचं स्पष्टीकरणही निवडणूक आयोगानं मंगळवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले होते.

चौकशीचीही मागणी

कायेदशीर कारवाई करण्याची भूमिका घेतल्यानंतर निवडणूक आयोगानं हॅकर शुजाविरोधात मंगळवारी दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार शुजाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शुजाचे सर्व दावे, आरोप खोटे असून याप्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही निवडणूक आयोगानं आपल्या तक्रारीत केली आहे. 


हेही वाचा-

हॅकर शुजाचा दावा निवडणुक आयोगानं फेटाळला

इम्तियाज जलिल यांचा यु टर्न, मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे


पुढील बातमी
इतर बातम्या