Advertisement

इम्तियाज जलिल यांचा यु टर्न, मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे


इम्तियाज जलिल यांचा यु टर्न, मराठा आरक्षणाविरोधातील याचिका मागे
SHARES

मराठा आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचं म्हणत एमआयएमचे औरंगाबादमधील आमदार इम्तिजाय जलिल यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मराठा आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिका दाखल होऊन काहीच दिवस झाले असताना इम्तियाज जलिल यांनी मंगळवारी युटर्न घेतला आहे. मुस्लिम आमदारांकडून पाठिंबा न मिळाल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ही याचिका मागे घेतल्याचं म्हटलं जात आहे. इम्तियाज जलिल यांनी मात्र केंद्र सरकारने नुकतचं १० टक्के आरक्षण लागू केलं असून त्यात मुस्लिमांचाही समावेश आहे. मात्र १० टक्के आरक्षणाविरोधातही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. तेव्हा १० टक्के आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट होणं बाकी आहे. त्यामुळे 'आम्ही वेट अॅण्ड वाॅच'ची भूमिका घेत ही याचिका मागे घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.


न्यायालयात याचिका दाखल

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये लागू करण्यात आलं आहे. मात्र हे आरक्षण घटनाबाह्य आहे, या आरक्षणामुळे राज्यातील आरक्षणाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या वर गेली अाहे असं म्हणत अॅड. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यापाठोपाठ इम्तियाज जलिल यांनीही मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल करत राज्य सरकारच्या, मराठा आरक्षणाच्या अडचणी वाढवल्या. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना मुस्लिम समाजाला डावलत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचंही त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं.तर त्याचवेळी मुस्लिम समाजाला आरक्षण देणारीही याचिका त्यांनी दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी २३ जानेवारीला सुनावणी ठेवण्यात आली आहे.


वेट अॅण्ड वाॅचची भूमिका

मात्र, ही सुनावणी होण्याआधीच मंगळवारी दुपारी इम्तियाज जलिल यांनी मराठा आरक्षणाविरोधातील आपल्या याचिकेसह मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी करणारी याचिका मागे घेतली आहे. मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर इम्तियाज जलिल यांच्याविरोधात मराठा समाजात रोष होता तर त्यांच्यावर यावरून मोठी टीकाही होत होती. या रोषानंतर वा टीकेनंतर ही याचिका मागे घेतल्याची शक्यता व्यक्त होत असताना इम्तियाज जलिल यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. आपण वेट अॅण्ड वाॅचची भूमिका घेतली आहे, १० टक्के आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट होईपर्यंत आपण याचिकेतून माघार घेतली आहे. त्यानंतर मात्र मुस्लिमांना आरक्षण मिळालं नाही तर नक्कीच आम्ही पुन्हा न्यायालयात जाऊ असंही इम्तियाज जलिल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

सरकार बरखास्त करा, ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भूमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा