अचानक चढला मुंबईचा पारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गेल्या काही दिवसांपासून गुलाबी थंडीचा अनुभव घेणाऱ्या मुंबईकरांना मंगळवारपासून उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवारी सांताक्रुज परिसरात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असून, कुलाबा परिसरात ३२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेतल्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीपासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत किमान तापमानातही वाढ झाली असून, सांताक्रुज परिसरात १९.६ अंश सेल्सिअस, तर कुलाबा परिसरात २१.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे.

थंडीत रेकॉर्ड ब्रेक

अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी पश्चिम आणि वायव्य दिशेकडून गार वारे वाहत होते. रात्रीच्या वेळी मात्र पूर्वेकडून गार वारे वाहत असल्याने, मुंबईकरांनी रात्रीप्रमाणे दिवसाही कडाक्याच्या अनुभव घेतला. विशेष म्हणजे यंदा जानेवारी महिन्यात थंडीत कमाल तापमान २७.२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं होतं. यामुळं जानेवारीमध्ये कडाक्याच्या थंडीने बरेच रेकॉर्ड ब्रेक केले होते; परंतु सोमवारी रात्रीपासून तापमानात अचानक वाढ झाली असून, आर्द्रताही वाढल्यानं उकाडा जाणवू लागला आहे.

संसर्गजन्य रोगांची भीती

मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मुंबई परिसरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं असून, शुक्रवारपासून तापमानात घट होण्यास सुरूवात होईल. दरम्यान येत्या काही दिवसात जमिनीवरून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा मुंबईवर प्रभाव होणार असल्यानं तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान तापमानात अचानक झालेल्या या बदलामुळे संसर्गजन्य रोग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा -

मुंबईत फ्लेमिंगोच्या संख्येत वाढ

धक्कादायक! एअर इंडियाच्या खाद्यपदार्थात झुरळ


पुढील बातमी
इतर बातम्या