एअरपोर्ट फनेल झोनमधील रखडलेल्या पुनर्विकासाला गती

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील सांताक्रूझ, विलेपार्ले आणि कुर्ला परिसरातील एअरपोर्ट फनेल झोनमधील जुन्या इमारतींच्या रखडलेल्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि संबंधित यंत्रणांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एअरपोर्ट फनेल झोनमधील पुनर्विकासासाठी फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) वापराबाबतचे धोरण तातडीने अंतिम करण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना या झोनमध्ये किती FSI देता येईल, याचा अभ्यास करण्यास सांगितले. तसेच वापरात न आलेला (Unused) FSI शेजारच्या किंवा जवळील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये समाविष्ट करता येईल का, याचीही तपासणी करण्याचे निर्देश दिले.

रस्ते रुंदीकरण प्रकल्पांमध्ये ज्या पद्धतीचा वापर केला जातो, त्याच धर्तीवर ही यंत्रणा विकसित करण्याचा विचार करण्यास सांगितले आहे.

याशिवाय, संबंधित रस्त्याच्या रुंदीच्या आधारावर अधिक FSI देऊन पुनर्विकास प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी BMC ला दिले.

प्रभावित इमारतींचे मॅपिंग करण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी एअरपोर्ट फनेल झोनमुळे प्रभावित झालेल्या सर्व इमारतींचे मॅपिंग करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच जुहू परिसरात लष्करी ट्रान्समिशन निर्बंधांमुळे रखडलेल्या इमारतींच्या पुनर्विकासालाही गती देण्यास सांगितले.

यासोबतच नगरविकास विभागाने BMC, Maharashtra Housing and Area Development Authority (MHADA), City and Industrial Development Corporation (CIDCO) आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये समन्वय साधून पुनर्विकास प्रक्रिया जलदगतीने राबवावी, असेही निर्देश देण्यात आले.

हजारो रहिवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) परिसरातील उंचीवरील निर्बंधांमुळे एअरपोर्ट फनेल झोनमधील हजारो जुन्या इमारतींचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. उंचीची मर्यादा असल्याने विकासकांना प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने अनेक इमारतींचे पुनर्विकास थांबले आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या नव्या निर्देशांमुळे या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळण्याची आणि या भागातील हजारो रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


हेही वाचा

झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

पुढील बातमी
इतर बातम्या