Advertisement

झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर थेट कारवाई

चेंबूर दुर्घटनेनंतर BMCचा मोठा निर्णय;

झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर थेट कारवाई
SHARES

चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नेमलेल्या चौकशी समितीने महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. रस्ते किंवा पायाभूत सुविधांच्या कामांदरम्यान झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्यास संबंधित कंत्राटदार आणि पालिकेच्या विभागांना थेट जबाबदार धरण्याची शिफारस समितीने केली आहे.

ही समितीचा अहवाल शुक्रवारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे सादर करण्यात आला.

अहवालानुसार, भविष्यातील सर्व BMC निविदांमध्ये (टेंडर) झाडांचे, विशेषतः त्यांच्या मुळांचे संरक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर निश्चित करणारे बंधनकारक कलम समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

तसेच, रस्ते, भूमिगत सुविधा किंवा इतर पायाभूत प्रकल्प सुरू करण्यापूर्वी झाडांच्या मुळांवर होणाऱ्या परिणामाचे वैज्ञानिक मूल्यांकन करणे अनिवार्य करण्यात यावे, असेही समितीने सुचवले आहे.

याशिवाय, अशा कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रमाणित आर्बोरिस्ट (वृक्षतज्ज्ञ) आणि ट्री सर्जन यांची नियुक्ती करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

चेंबूर दुर्घटनेनंतर चौकशी

30 जून रोजी चेंबूरमध्ये पिंपळाचे झाड शाळेच्या बसवर कोसळून इयत्ता सहावीतील विद्यार्थी विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता, तर अन्य चार विद्यार्थी जखमी झाले होते. प्राथमिक चौकशीत झाडाची मुख्य मुळे कमकुवत झाल्याचे आढळून आले. त्यानंतर BMC ने तीन अभियंत्यांना निलंबित करत दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती केली होती.

'वृक्षमित्र' उपक्रमाची शिफारस

समितीने "वृक्षमित्र" हा उपक्रम सुरू करण्याचीही शिफारस केली आहे. या उपक्रमांतर्गत गृहनिर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था (NGO) आणि नागरिकांनी आपल्या परिसरातील झाडांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून संभाव्य धोक्याची माहिती महापालिकेला द्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

धक्कादायक आकडेवारी

अहवालानुसार,

  • ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 या कालावधीत झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्याप्रकरणी 428 नोटिसा बजावण्यात आल्या.

  • याच कालावधीत 2,615 झाडांच्या मुळांचे नुकसान झाल्याची नोंद झाली.

  • यंदाच्या पावसाळ्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईत सुमारे 1,200 झाडे आणि फांद्या कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे.

चेंबूरमधील दुर्घटनेनंतर BMC ने झाडांच्या सुरक्षिततेबाबत अधिक कठोर धोरण स्वीकारण्याच्या दिशेने पावले उचलली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कंत्राटदार आणि संबंधित विभागांची जबाबदारी निश्चित करण्यावर भर दिला जात आहे.



हेही वाचा

ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्प : धूळ-आवाज प्रदूषणावर नोटीस

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा