केस सुंदर, काळेभोर दिसण्यासाठी आणि केस वाढण्यासाठी महागडे, ब्रॅण्डेड शॅम्पू-कंडिशनर लावण्याकडे तरुण-तरुणींचा मोठा कल असतो. पण ब्रॅण्डेड शॅम्पू-कंडिशनरचा नाद तुम्हाला महागात पडू शकतो. कारण ‘लॉरिअल’सारख्या महागड्या-ब्रँडेड कॉस्मॅटिकच्या नावाखाली बनावट कॉस्मॅटिक विकलं जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
'लॉरिअल’च्या रिकाम्या कंटेनर्स भंगारवाल्यांकडून खरेदी करत त्यात बनावट, अवैधरित्या-विना परवाना तयार केलेलं शॅम्पू आणि कंडिशनर या कंटेनर्समध्ये भरून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अखेर अन्न आणि औषध प्रशासाना (एफडीए)नं केला आहे. महत्त्वाचं म्हणजे या बनावट शॅम्पू-कंडिशनरचा वापर पार्लरमध्ये आणि सुपरमार्केटमध्ये विकलं जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे पार्लरमध्ये गेल्यास आणि मार्केटमधून शॅम्पू आणि कंडिशनर खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
अन्नपदार्थ आणि औषधांबरोबरच कॉस्मॅटिक, शॅम्पू आणि कंडिशनरमध्येही मोठ्या प्रमाणावर भेसळ होते. नुकताच एफडीएनं वापरलेल्या तेलाच्या नावाखाली ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकीचा पर्दाफाश केल्यानंतर आता एफडीएनं बनावट शॅम्पू-कंडिशनरच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीला दणका दिला आहे. एफडीएच्या बृहन्मुंबई विभागा (औषध)तील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अधिकाऱ्यांनी 4 मे रोजी मुंबईतील तीन ठिकाणी छापे टाकत ‘लॉरिअल’च्या कंटेनर्समधून बनावट शॅम्पू-कंडिशनर विकणाऱ्या टोळीचा छडा लावला आहे.
अंधेरी (प) येथील नवरंग सिनेमा, जवळील मे. बायो कॉस्मेटिक्स या नावाखाली रावरिया बनावट शॅम्पू-कंडिशनर तयार करत असल्याचंही समोर आलं आहे. यमुनाबाई चाळीत छापा टाकला असताना अधिकाऱ्यांना 40 लाखांचा बनावट माल तर 3.38 लाखांचा कच्चा माल आणि इतर सामग्री एफडीए अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे.
साकीनाका येथील, सेठिया नगरमधील पोळ चाळ क्रमाक 2 इथून रावरिया यांनी जुन्या-रिकाम्या कंटेनर्सची खरेदी केल्याचं समोर आलं. त्यानुसार या ठिकाणी छापा टाकला असता इथंही बनावट शॅम्पू-कंडिशनरचा साठा आढळला असून येथून पुजारी नावाच्या व्यक्तिकडून 90 लाखांचा कच्चा माल आणि इतर सामग्री जप्त केली आहे.
पुजारी यानं बनावट शॅम्पू-कंडिशनरची खरेदी हेन्री डिसुजा याच्याकडून खरेदी केल्याचं पुजारीच्या चौकशीतून समोर आलं. त्याप्रमाणे डिसुजाच्या पार्ल्यातील दुकानात छापा टाकला असता इथंही बनावट शॅम्पू-कंडिशनर तयार केलं जात असल्याचं आढळून आलं आहे. तर या ठिकाणाहूनही एफडीए अधिकाऱ्यांनी 4 लाख 88 हजाराचा कच्चा माल जप्त केला आहे.
शॅम्पू-कंडिशनरचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून एफडीए आणि पोलिस याप्रकरणी पुढील कारवाई करत आहे. दरम्यान ग्राहकांनी पार्लरमध्ये गेल्यास ब्रॅण्डेड उत्पादनं वापरताना, सुपरमार्केटमधून उत्पादनं खरेदी करताना विशेष काळजी घ्यावं, असं आवाहन खडतरे यांनी केलं आहे. तर वापरून झालेलं कंटेनर तसेच कचऱ्यात किंवा भंगारात न फेकता तोडून-कापून कचऱ्यात-भंगारात टाकावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा -
तुम्ही वापरलेलं तेल जेवणासाठी वापरत नाही ना?
सावधान! बाजारात कॅल्शियमच्या बनावट टॅबलेट, काळाचौकीतून ७५ हजारांचा साठा जप्त